नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागातून होणारी खैर तस्करी रोखण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत वनविभागाने एक टोयोटा क्वालिस कार व १० खैर लाकडे असा सुमारे १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, तस्कर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून, जप्त केलेले वाहन गुजरातमधील असल्याने वनविभागाने त्यादृष्टीने तपासाला सुरूवात केली आहे.
सुरगाणा व उंबरठाण प्रादेशिक वनक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आंबाठा व लोळणी गावाच्या भागात संयुक्तरित्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास गस्ती करून वाहनाची तपासणी करत होते. त्याचवेळी रस्त्याच्या लगत एक चारचाकी वाहन क्रमांक (जीजे ०५, सीडी ६१४६) हे संशयित रित्या उभे असल्याचे दिसून आले. या वाहनाची तपासणी करण्यासाठी वन कर्मचारी गेले असता वाहनातील एका संशयितासह आजुबाजुला लपलेल्या 4 ते 5 इसम अंधारात जंगलाच्या दिशेने पळून गेले.
वाहन तपासणीत खैर प्रजातीच्या वृक्षाचे ताजे नग चीरकाम करून भरले आढळून आले. अवैधरित्या वाहतूक होत असल्याची खात्री पटल्यावर वाहनासह खैर नग ताब्यात घेण्यात आले. उपवनसंरक्षक उमेश वावरे व सहाय्यक वनसंरक्षक हेमंत शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी काशिनाथ गायकवाड, वनरक्षक भटू बागुल, रामजी कुवर, तुकाराम चौधरी, हिरामण थविल आदींनी कारवाईत सहभाग घेतला.