जळगाव पुढारी वृत्तसेवा : जळगाव येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ३० हजाराची लाच घेताना कार्यालयातच अटक केली आहे. या कारवाईने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे.
जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरिटी गार्डच्या नोकरीसाठी जळगाव जिल्ह्यातील एकाने अर्ज केला होता. या कार्यालयातील चौधरी नामक शिपायाने आपले कार्यालयातील वरिष्ठांशी घनिष्ट संबंध असल्याची बतावणी करत तक्रारदाराचा विश्वास संपादन करत नोकरी लावून देण्यासाठी २ लाख १० हजारांची मागणी केली होती.
पहिल्या टप्प्यात सोमवारी तीस हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदवली होती. जळगाव कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचत तीस हजारांची लाच स्वीकारताना शिपायास रंगेहात अटक केली. हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन .एस.न्याहळदेयांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे आदींच्या पथकाने केली आहे.