सायनमध्ये बिल्डरांसाठी २१,५०० झाडांचा बळी? | पुढारी

सायनमध्ये बिल्डरांसाठी २१,५०० झाडांचा बळी?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरातील झाड वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्न करत असतानाच शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण दरवर्षी हजारो झाडांच्या कत्तलीला परवानगी देत आहे. गेल्या 11 वर्षांत तब्बल 40 हजार झाडांची कत्तल करण्यात आली असून, बिल्डरांसाठी 21 हजार 500 झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली. या वृक्षतोडीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सायन कोळीवाडा, सरदार नगर क्र. 2, त्रिलोचन इमारतीच्या पुनर्बांधणी कामादरम्यान 22 झाडे तोडण्यात आली, तर पुनर्रोपणाच्या नावाखाली 11 झाडे हटवण्यात आली. वृक्ष प्राधिकरणाने एका बिल्डरसाठी ही झाडे तोडण्यास मंजुरी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी केला. काँग्रेसचा पुनर्विकासाला विरोध नाही; मात्र खरोखरच नागरिकांचे हित असते तेथे अर्थकारण लपल्यामुळे झाडे कापण्यास परवानगी मिळत नाही, असे ते म्हणाले.

सायन येथे पावसाळ्यात साचणार्‍या पाण्याचा तातडीने निचरा व्हावा, यासाठी वडाळा टीटी नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु, काही झाडांचा अडथळा असल्यामुळे नाल्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. दुसर्‍या बाजूस, त्रिलोचन इमारतीच्या पुनर्विकासासाठी मात्र झाडे तोडण्यास तातडीने परवानगी देण्यात आली.

वृक्ष प्राधिकरणात झाडे कापण्यासाठी कोणत्या आधारावर परवानगी देण्यात येते, याबाबत आपण आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवणार असल्याचे रवी राजा यांनी सांगितले. फेब्रुवारी 2010 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत तब्बल 40 हजार झाडांची कत्तल करण्यात आली. इमारतींचे बांधकाम रखडत असल्याच्या कारणावरून बिल्डरांसाठी 21 हजार 500 झाडांची कत्तल करण्यात आली, असा आरोप रवि राजा यांनी केला. वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्तांनी वृक्षतोड थांबवावी, अन्यथा त्यांच्यांकडेही संशयाच्या नजरेने पाहिले जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, सायन येथील झाडे नियमानुसार कापण्यात आली, असा दावा उद्यान विभागाने केला आहे.

काँग्रेस नगरसेविका निलंबित होणार?

सायन कोळीवाडा येथील झाडे कापण्यास काँग्रेस नगरसेविका सुषमा राय यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसने त्यांना नोटीस बजावली आहे. अनेकदा काँग्रेसच्या आदेशाविरोधात काम केल्यामुळे सुषमा राय यांच्या निलंबनाची मागणी पक्षाचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे करणार असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

Back to top button