अकोल्याचा अभिजित सारंग कसा बनला कालीचरण महाराज | पुढारी

अकोल्याचा अभिजित सारंग कसा बनला कालीचरण महाराज

रायपूर/ भोपाळ/ अकोला ; वृत्तसंस्था : शांतता व सुव्यवस्थेला धोका पोहोचविल्याच्या तसेच राजद्रोहाच्या आरोपावरून कालीचरण महाराज यांना छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशात अटक केली.

‘धर्मसंसद’ शीर्षकांतर्गत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले होते. म. गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केल्यावरून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कारवाईपूर्वी छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना माहिती द्यायला हवी होती, असा आक्षेप छत्तीसगड सरकारच्या या कारवाईवर मध्य प्रदेश सरकारने गुरुवारी घेतला.

छत्तीसगडमधील टिकारपारा पोलिस ठाण्यात कालीचरण महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून कालीचरण महाराज यांना बुधवारी पहाटे चार वाजता अटक केली.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे तर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. छत्तीसगड सरकारच्या पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना न कळवताच कालीचरण महाराज यांना अटक केली. त्यामुळे मध्य प्रदेश पोलिस महासंचालकांना, छत्तीसगडच्या पोलिस महासंचालकांकडे कालीचरण महाराजांच्या अटकेच्या प्रक्रियेबाबत निषेध नोंदवण्याच्या सूचना मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, आमच्या पोलिसांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता ही कारवाई केली आहे, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी स्पष्ट
केले आहे.

कालीचरण महाराज मूळचे अकोला जिल्ह्यातील

* कालीचरण महाराज हे मूळचे अकोल्यातील आहेत. त्यांचे नाव अभिजित धनंजय सारंग असे आहे. त्यांचे जुने घर शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ आहे.
* कालीचरण यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. अध्यात्माकडे ओढ असल्याने शाळा सोडली आणि हरिद्वारला जाऊन दीक्षा घेतली.
* कालिका मातेचे भक्‍त म्हणून त्यांनी कालीचरण हे नाव धारण केले. काली ही माझी आई, तर अगस्ती ऋषी हे गुरू, असे ते सांगतात.
* दोन वर्षांपूर्वी कालीचरण यांनी एका पुरातन शिवमंदिरात शिवतांडव स्तोत्र म्हटले. ते देशभरात प्रचंड लोकप्रिय ठरले होते.
* सन 2017 मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कालीचरण महाराज उभे राहिले; मात्र त्यांचा पराभव झाला होता.

Back to top button