Lok Sabha Election : 85 वर्षांवरील सर्वाधिक मतदार महाराष्ट्रात | पुढारी

Lok Sabha Election : 85 वर्षांवरील सर्वाधिक मतदार महाराष्ट्रात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वयोवृद्ध अर्थात वय वर्षे 85 आणि त्या पुढील ज्येष्ठ नागरिक मतदारांना आपल्या राहत्या घरातूनही मतदानाचा हक्क बजावण्याची सोय यंदा निवडणूक आयोगाने करून दिली आहे. विशेष म्हणजे या वयोगटात महाराष्ट्रात सर्वाधिक मतदार असून त्यांची संख्या 13 लाखांच्या घरात आहे. हे ज्येष्ठ नागरिक आपल्या घरूनच मतदानाचा हक्क बजावणार की पारंपरिक पद्धतीने मतदान केंद्रात जाऊन मतदान करणार, हे जाणून घेण्यासाठी निवडणूक कर्मचारी सध्या वयोवृद्ध मतदारांच्या भेटीला घरोघरी जात आहेत. ( Lok Sabha Election )

संबंधित बातम्या 

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. एकीकडे राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचाराला लागले आहेत. तर, दुसरीकडे निवडणूक आयोगही मतदारांच्या जागृती, प्रबोधनासाठी कामाला लागली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी येणार नाहीत, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यंदाच्या वर्षी 85 वर्षांपुढील मतदारांना घरातूनच मतदानाचा हक्क बजावण्याचा पर्याय देण्यात आला आहे. देशभरात या वयोगटातील तब्बल 81 लाख मतदार आहेत. यात 13 लाख वयोवृद्ध ज्येष्ठ मतदारांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

देशातील सर्वात मोठे राज्य मानले जाणाऱ्या उत्तर प्रदेशचा याबाबत दुसरा क्रमांक लागतो. उत्तरप्रदेशात 10.4 लाख वयोवृद्ध मतदार आहेत. तर, 6.6 लाख मतदारांसह बिहारचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो. 85 हून अधिक वयाच्या वयोगटातील मतदारांची सर्वात कमी नोंदणी ही तमिळनाडू आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आहे. लक्षद्वीप येथे अवघे 109 वयोवृद्ध मतदार आहेत. दादरा नगर हवेली आणि दीव दमणमध्ये 698 तर अंदमान निकोबार बेटांवर 1 हजार 37 वयोवृद्धांनी नोंदणी केली आहे.

महाराष्ट्रातील या 13 लाख वयोवृद्धांच्या मतदानाचे ठिकाण नक्की करण्यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतदार याद्यांवरील पत्ता धुंडाळत आहेत. ब्लॉक लेव्हलचे अधिकारी, कर्मचारी मतदार याद्यांतील पत्त्यांवर वयोवृद्ध मतदारांपर्यंत पोहचत आहेत. या मतदारांची भेट घेऊन त्यांना घरूनच मतदान करता येणार असल्याची माहिती देत आहेत. जे मतदार घरून मतदानाचा पर्याय स्वीकारतील त्यांच्याकडून 12-ड हा वेगळा अर्ज भरून घेतला जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. वयोवृद्ध मतदारांनी भरलेले 12-डचे अर्ज जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकर्‍यांकडे जमा केले जातील. या कार्यालयांकडून वृद्धांच्या मतदानासाठीची कार्यवाही करण्यात येईल.

कधीपर्यंत भरता येणार अर्ज

उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पाचव्या दिवसांपर्यंत घरूनच मतदानाचा अधिकार बजावण्यासाठीचा अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी 12-ड हा अर्ज भरता येईल. ( Lok Sabha Election )

वयोवृद्धांमध्ये महिलांचा टक्का अधिक

देशभरातील 85 वर्षांपुढील मतदारांच्या वयोगटात 81 लाख मतदार आहेत. यात महिलांचे प्रमाण 58 टक्के इतके आहे. 47.3 लाख महिला तर 33.8 लाख वयोवृद्ध मतदार हे नोंदणीकृत आहेत. तर, महाराष्ट्रातील वयोवृद्ध महिला मतदारांचे प्रमाण 56 टक्के इतके आहे. महाराष्ट्रातील 13 लाख वयोवृद्ध मतदारांपैकी 7.3 लाख महिला तर 5.7 लाख पुरूष मतदार आहेत.

Back to top button