सोन्याच्या बाजारभावात ‘या’ रेकॉर्डची शक्यता..! | पुढारी

सोन्याच्या बाजारभावात 'या' रेकॉर्डची शक्यता..!

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, बँकांनी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये कपात करण्याचे केलेले सुतोवाच आणि अशातच इराणने इस्त्राईलवर केलेला हल्ला यामुळे सोने-चांदीच्या बाजारभावाचा नवीन उच्चांक करण्यास कारणीभूत ठरणार आहे. जगात जेव्हा कोणत्याही देशांमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते, दोन देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण होतो, त्यावेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. पर्यायाने सोन्याचे भाव वाढतात, असे इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन (इब्जा) चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.

शुक्रवारी इराणने इस्त्राईलवर हल्ल्याची तयारी केली असे समजताच सोन्याच्या बाजारभावाने उसळी घेतली. 24 कॅरेट सोन्याचा भाव एक तासात 72 हजार रुपयांवरून वाढून 73 हजार 500 झाला होता. परंतु अमेरिकेने मध्यस्थी केल्याने दोन देशातील तणाव निवळला. तणाव निवळल्यामुळे रात्रीतून पुन्हा सोन्याचे भाव जैसे थे होऊन 72 हजारांवर स्थिरावले होते. पण, आता तणाव पुन्हा वाढल्याने शनिवारी व रविवारी भारतीय बाजारपेठ बंद असल्याने परिणाम दिसून येत नसले तरी सोमवारी मात्र सोन्याचे बाजारभाव 75 हजारांचा टप्पा पार करण्याची तर चांदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आळंदीकर यांनी सांगितले. पुढील आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली तर त्याचाही परिणाम सोने-चांदीच्या भाववाढीवर होऊ शकतो. परंतु जर चर्चेतून किंवा इतर देशांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला किंवा भू-राजकीय तणाव निवळला तर सोन्याचे बाजारभाव 71 हजार रुपये तोळ्याच्या आसपास आणि चांदीचे बाजारभाव 83 हजार रुपये किलोच्या आसपास स्थिरावतील, असेही आळंदीकर यांनी सांगितले.

सोने बुकिंग करणे गरजेचे

ज्या ग्राहकांना आपल्या घरातील लग्नकार्यासाठी सोने खरेदी करायचे आहे किंवा गुंतवणूक करायची आहे, अशा ग्राहकांनी ज्या दुकानात सोने बुकिंगची सुविधा असेल तिथे ठराविक रक्कम भरून दागिने किंवा सोने बुकिंग करावे. असे केल्यास ग्राहकांना सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले तरी नुकसान होत नाही, असे पूनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ पेढीचे संचालक शुभम आळंदीकर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button