राष्ट्रवादी मुलीच्या, तर शिवसेना पुत्रप्रेमामुळे फुटली; अमित शहा यांची टीका

अमित शहा
अमित शहा

भंडारा : पुढारी वृत्तसेवा :  उद्धव ठाकरे म्हणतात, भाजपने आमचा पक्ष फोडला. शरद पवारही भाजपनेच आमचा पक्ष फोडल्याचे सांगतात. पण भाजपने कुणाचाही पक्ष फोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहाने शिवसेना फोडली; तर शरद पवार यांच्या मुलीच्या प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केली.

संबंधित बातम्या 

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आता अर्धी शिवसेना आणि अर्ध्या राष्ट्रवादीने संपूर्ण काँग्रेसला अर्धे केले आहे. आता या तीन अर्ध्या पार्ट्या महाराष्ट्राचे भले कसे करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे भले फक्तभाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात, असा विश्वासही त्यांनी केला.
ते म्हणाले, पुढील पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महान भारताची रचना करण्याचे काम सुरू होणार आहे. काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन मत मागितले जाते. याच काँग्रेसने 1954 च्या भंडारा लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्याचे काम केले. पाच दशकांनंतरही काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. व्ही. पी. सिंग यांच्या कार्यकाळात भाजपच्या सहकार्यातून डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न दिला गेला.

भाजपला 400 च्या वर जागा मिळाल्यास आरक्षण संपेल, असा भ्रम काँग्रेसकडून पसरविला जात आहे. परंतु दोनदा बहुमत असतानाही भाजपने त्याचा गैरफायदा आरक्षण संपविण्यासाठी केला नाही. बहुमताचा फायदा आम्ही कलम 370 हटविण्यास आणि तिहेरी तलाक समाप्त करण्यासाठी केला. जोपर्यंत भारतीय जनता पक्ष राजकारणात आहे तोपर्यंत आरक्षण संपणार नाही आणि आम्ही संपवू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

मोदींमुळे अयोध्या येथे राम मंदिर पूर्णत्वास आले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. पण काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात राम मंदिर बनू दिले नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबी हटावचा नारा दिला आहे. परंतु, तो नारा इंदिरा गांधी यांच्या काळातील आहे.
काँग्रेसच्या काळात कृषी कल्याण विभागासाठी 22 हजार कोटींची तरतूद होती. परंतु नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2022-23 मध्ये एक लाख 25 हजार कोटींची तरतूद करून कृषी क्षेत्राला मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज देशात 830 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी होते. तिसर्‍यांदा मोदी पंतप्रधान बनल्यानंतर समान नागरिक कायदा आणणार, वारंवार निवडणुका न घेता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रभारी आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, खा. प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.

तीन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात आणणार

नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात देशाला सुरक्षित व समृद्ध केले. महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, बिहार, झारखंडमधील नक्षलवाद संपवले. तीन वर्षांत छत्तीसगडमधील नक्षलवादही संपवू, असा ठाम निर्धार शहा यांनी बोलून दाखवला.

अमित शहा म्हणाले….

– राज्यघटना, आरक्षण संपणार नाही
– काँग्रेसकडून डॉ. आंबेडकरांची उपेक्षा
– काँग्रेसने राम मंदिर बनू दिले नाही
– सत्तेत आल्यास समान नागरी कायदा आणणार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news