सचिन वाझे : एनआयने जबरदस्तीने कागदांवर सह्या घेतल्या | पुढारी

सचिन वाझे : एनआयने जबरदस्तीने कागदांवर सह्या घेतल्या

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने स्थापन केलेल्या चांदिवाल आयोगाकडील सुनावणीदरम्यान धक्कादायक गोष्टी समोर येत असून केंद्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत असताना प्रचंड दबावात होतो. ती वेळ आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त कठीण वेळ होती. 28 दिवस कोठडीत होतो. त्याठिकाणी आपला छळ केला. त्यामुळे मी आजही ट्रॉमामध्ये आहे. एनआयएने माझ्या मागणीनुसार काहीच कागदपत्रे दिली नाहीत. उलट आपल्याकडून जबरदस्तीने अनेक कागदपत्रांवर सह्या घेतल्याचा धक्कादायक दावा पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या आरोपी अधिकारी सचिन वाझे याने केला आहे.

मंगळवारी चांदिवाल आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वतीने अ‍ॅड.अनिता कॅस्टलिनो यांनी वाझेची उलट तपासणी घेतली. यावेळी वाझे याने एनआयए अधिकार्‍यांच्या दबावाखाली असल्याचे स्पष्ट केले.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल्स, बार, आर्केस्ट्रा चालकांकडून पोलिसांना 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप करुन परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी चांदिवाल आयोग गेले काही दिवस सचिन वाझे याची चौकशी करत आहे. यातच परमबीर सिंग हे सोमवारी चौकशीसाठी आयोगासमोर हजर झाले. तर, अनिल देशमुख यांनीही मंगळवारी आयोगासमोर चौकशीला हजेरी लावली.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅन्टिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी केल्याचे प्रकरण आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एकत्रित तपास एनआयए करत आहे. याप्रकरणी एनआयएने सचिन वाझे याना अटक केली होती. याच संदर्भात मंगळवारी वाझे यांच्याकडे आयोगासमोर चौकशी करण्यात आली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात सोमवारी झालेल्या भेटीचा मुद्दा तापलेला असतानाच मंगळवारी वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याने एकच खळबळ उडाली. दोघांच्या भेटीने वसुली प्रकरणाला टर्न मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या दोन्ही भेटींप्रकरणात मुंबई पोलीस तपास करतआहेत आहेत.

* चांदिवाल आयोगासमोर चौकशीवेळी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देशमुखांनी वाझेंना टाळण्याचा प्रयत्न केला. तसेच आयोगानेही वाझेंना बोलण्यापासून रोखले. त्यानंतर मात्र भेटलेल्या काही निवांत वेळेत आयोगाच्या बाजूच्या खोलीमध्ये वाझे आणि देशमुख भेटले. दोघांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळते.

देशमुखांना 15 हजार दंड

आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यानअनिल देशमुखांच्या वतीने ज्येेष्ठ वकिलांना सचिन वाझेची उलट तपासणी घेण्याची परवानगी मागण्यात आली . तशी विनंतीही आयोगाला केली.याची दखल आयोगाने घेत या उलटतपासणीसाठी परवानगी देताना अनिल देशमुखांना पंधरा हजार रूपयांचा दंड ठोठावला दंडाची रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश दिले.

Back to top button