परमबीर सिंग यांनी लपवला कसाबचा मोबाईल : शमशेर पठाण | पुढारी

परमबीर सिंग यांनी लपवला कसाबचा मोबाईल : शमशेर पठाण

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांचे सत्र सुरूच आहे. मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेले सहायक पोलीस आयुक्‍त शमशेर पठाण यांनी सिंग यांच्यावर 26/11 दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेल्या अजमल कसाब याचा मोबाईल लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पठाण यांनी हा आरोप केला आहे.

पठाण यांनी मुंबई पोलीस आयुक्‍तांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. पठाण यांच्या आरोपाने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट पोलिसांना दिल्याचा गंभीर आरोप करून परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र, परमबीर सिंग यांच्यावरही भ्रष्टाचारांच्या आरोपांचे सत्र सुरू झाले. आता तर मुंबईतील निवृत्त सहायक पोलीस आयुक्‍त शमशेर पठाण यांनी परमबीर सिंग यांच्यावर दहशतवादी कनेक्शनचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते. डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. आर. माळी यांनी आपल्याला कसाबकडे एक मोबाईल फोन सापडल्याचे सांगितले होते.

तो फोन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता. हा मोबाईल परमबीर सिंग यांनी चौकशीसाठी घेतला होता. त्यावेळी ते राज्य दहशतवादविरोधी पथकात कार्यरत होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आली होती.

परमबीर सिंग यांनी हा मोबाईल गुन्हे शाखेकडे दिला असता, तर पाकिस्तानी हँडलर आणि इतर कुणी या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते का, हे कळू शकले असते. मात्र, परमबीर सिंग यांनी तो मोबाईल गुन्हे शाखेकडे दिला नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी यांनी याबाबत तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्‍त व्यंकटेश यांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर माळी हे मोबाईल घेण्यासाठी परमबीर सिंग यांच्याकडे गेले असता परमबीर सिंग यांनी “कुठला मोबाईल, गेट आऊट” असे उत्तर दिले होते. परमबीर सिंग यांनी हा मोबाईल लपवून ठेवला होता, असा दावा पठाण यांनी केला आहे. पठाण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

* मुंबई पोलीस आयुक्‍तांना लिहिलेल्या पत्रात परमबीर यांनी दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल लपवून ठेवला होता की, कोणाला तरी दिला होता, याची सविस्तर चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी शमशेर खान पठाण यांनी केली आहे. तसेच मी सेनेत असताना परमबीर डीसीपी होते आणि ते खूपच भ्रष्ट अधिकारी होते.

अजमल कसाब याने दहशतवादी हल्ल्यापूर्वी ज्या-ज्या लोकांशी भारतात संपर्क केला होता. त्या सर्वांना बोलावून परमबीर सिंग यांनी पैसे घेतले असतील, असा आरोपही शमशेर पठाण यांनी प्रसिद्धीमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

परमबीर सिंहना चांदिवाल आयोगाचा पुन्हा दणका

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदिवाल आयोगासमोर सातत्याने गैरहजर राहणार्‍या परमबीर यांना आयोगाने गुरुवारी पुन्हा दणका दिला. आयोगाच्या चौकशीला स्वत: हजर राहून सामोरे जा, अन्यथा वॉरंटला सामोरे जा, अशी तंबी चांदिवाल आयोगाने परमबीर यांना दिली.

परमबीर यांना आयोगासमोर हजर राहण्याची आठवण करून द्या . त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट अद्यापही लागू आहे. याची माहिती त्यांना द्या, अन्यथा पोलिसांना त्याच्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जातील, अशी तंबी देताना आयोगाने परमबीर सिंह कुठे आहेत, अशी विचारणाही वकिलांकडे केली त्यावर परमबीर मुंबईत असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली.

परमबीर सिंहना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले. त्यानंतर सिंह सुमारे 230 दिवसांनी गुरुवारी मुंबईत दाखल झाले आणि तपासात सहभाग घेतला.सिंह यांच्यावर चौकशी आणि वॉरंट व्यतिरिक्त खंडणीसंदर्भात अनेक एफआयआर दाखल आहेत.

Back to top button