तोक्‍ते चक्रीवादळ : नुकसानग्रस्तांसाठी १७० कोटी | पुढारी

तोक्‍ते चक्रीवादळ : नुकसानग्रस्तांसाठी १७० कोटी

नवी मुंबई ; राजेंद्र आहिरे : तोक्‍ते चक्रीवादळाच्या अस्मानी संकटात उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील 221258 नागरिकांना तर 11692.07 हेक्टर क्षेत्रावरील पिके, फळबागा भुईसपाट झालेल्या शेतकर्‍यांना राज्य सरकारने तब्बल 152 कोटी 48 लाख 28 हजार रकमेचा निधी जूनच्या शेवटच्या आठवड्यात वाटप करण्यात आला.

त्यामुळे ऐन खरीप हंगामात सरकारने आर्थिक मदतीचा हात दिल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोकण व्यतिरिक्‍त राज्यातील इतरही 22 जिल्ह्यांना सुमारे 182 कोटी 4 लाख 45 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

170 कोटींमुळे नुकसानग्रस्तांना हातभार लागला आहे. 17 मे रोजी कोकणातून गुजरातकडे गेलेल्या महाप्रलयकारी तोक्‍ते वादळाचा राज्यातील 29 जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. या विनाशकारी चक्रीवादळात कोकणातील कित्येक नागरिकांच्या संसाराचे वाटोळे झाले आहे.

मुंबईसह मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 2 लाख 21 हजार 258 नागरिकांना या वादळाचा तडाखा बसला.

यात मुंबई व उपनगर जिल्हा वगळता उर्वरित इतर 5 जिल्ह्यातील 11 हजार 692.07 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा भुईसपाट झाल्या होत्या .तर या नैसर्गिक आपत्ती तब्बल 18 जणांना आपला प्राण गमवावा लागला. याव्यतिरिक्त 2 नागरिक बेपत्ता होते.

या आसमानी संकटात तब्बल 4 हजार 230 गावांना फटका बसला, तसेच सुमारे 1 हजार 965 शासकीय महाविद्यालये आणि शाळांच्या भिंती कोसळल्या, याशिवाय गावागावातील 5068 विजेचे पोल खाली पडल्याने अंधाराचे साम्राज्य झाले होते.

27 हजार 478 लहान-मोठे झाडे गळून पडली होती 26 नागरिक जखमी झाले होते. विशेषत: पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 30 हजार नागरिकांचे नुकसान झाले होते, त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात 27 हजार 798 बाधितांच्या समावेश होता तर सर्वाधिक कमी ठाणे जिल्ह्यात 1300 नागरिकांना या वादळाचा फटका बसला होता.

7 जिल्ह्यातील 4230 बाधित गावांपैकी एकट्या रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक 1820 गावांचा समावेश होता. या संकटात 34 मुकी जनावरे दगावलीत. या पार्श्वभूमीवर 27 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचा निर्णय घेण्यात आला.

इतरही 22 जिल्ह्यांना अर्थसहाय्य

नागपूर विभागातील 6 नुकसानग्रस्त जिल्ह्यांना 42 लाख 26 हजार रकमेचा निधी, अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमधील बाधितांना 3 कोटी 57 लाख 37 हजार, औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील मृत जनावरांसाठी 90 हजार, नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांच्या आपदग्रस्तांच्या खात्यावर 1 कोटी 97 लाख 67 हजार, पुणे विभागाच्या 5 जिल्ह्यांना 3 कोटी 24 लाख 25 हजार रकमेचा निधी नुकसानग्रस्तच्या पंचनामानुसार जमा करण्यात आला आहे.

Back to top button