इंडिगोचा परवाना धोक्यात? दिल्ली-मुंबई विमानात सँडविचमध्ये अळी | पुढारी

इंडिगोचा परवाना धोक्यात? दिल्ली-मुंबई विमानात सँडविचमध्ये अळी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली-मुंबई प्रवासादरम्यान प्रवाशांला दिलेल्या सँडविचमध्ये अळी सापडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने इंडिगो कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याचा विचार का केला जाऊ नये, असे नोटीसीमध्ये म्हटले आहे. एका महिला प्रवाशाने सँडविचमध्ये अळी असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर ट्विट केला होता. महिलेच्या तक्रारीवरुन इंडिगोला नोटीस बजावली आहे.

शुक्रवार,29 डिसेंबर रोजी दिल्ली ते मुंबई विमान क्रमांक 6ए 6107 मध्ये प्रवास करणार्‍या खुशबू गुप्ता या महिला प्रवाशांने तिच्या सँडविचमध्ये अळी सापडल्याची तक्रार केली होती. याचा एक व्हिडिओ गुप्ता यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये गुप्ता यांनी अशा प्रकारचे अन्न एखाद्या प्रवाशाने खाल्ल्यानंतर त्याची तब्येत बिघडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. महिला प्रवाशांने तक्रार करताच इंडिगो कंपनीने तात्काळ प्रवाशांना सँडविच देणे बंद केले. तसेच प्रवाशांची माफी देखील मागितली.परंतु प्रवासी सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने इंडिगो कंपनीला 2 जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटिंस बजावली. इंडिगोला उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. येत्या 9 जानेवारी पर्यत इंडिगो कंपनीने लेखी उत्तर दयायचे आहे.

Back to top button