बलात्कार प्रकरणामध्ये केवळ ‘डीएनए’ पुरावा निर्णायक नाही, पीडितेची साक्ष ‘पुरेशी’ : ‘पोक्सो’ न्यायालय | पुढारी

बलात्कार प्रकरणामध्ये केवळ 'डीएनए' पुरावा निर्णायक नाही, पीडितेची साक्ष 'पुरेशी' : 'पोक्सो' न्यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अल्‍पवयीन मुलीवर झालेल्‍या बलात्काराच्या प्रकरणामध्ये केवळ ‘डीएनए’ पुरावा निर्णायक मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्ष‍ण नाेंदवत संबंधित प्रकरणामध्‍ये पीडितेची साक्ष सुसंगत आणि विश्वासार्ह होती. यामुळे ही साक्षच आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा ठरते, असे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) विशेष न्‍यायालयाने ( POCSO court ) स्‍पष्‍ट केले. तसेच अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार करणार्‍या दोघांना २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्‍याचार

१६ वर्षीय मुलगी एका दुकानात काम करत होती. तिथे तिच्‍या एका कर्मचार्‍याबरोबर मैत्री झाली. त्‍याने मुलीशी जबरदस्‍तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर पीडितेच्‍या आईच्या मित्राचा नवरा असलेल्या ३९ वर्षीय पुरुषानेही तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीची तब्‍येत बिघडली. वैद्यकीय तपासणीत तिला गर्भधारणा झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. मावशीने विचारणा केल्‍यानंतर मुलीवर झालेला अत्‍याचाराचा प्रकार उघडकीस आला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनंतर या प्रकरणी गुन्‍हा दाखल झाला. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

 POCSO court : पीडित मुलीचे मानसिक वय ११ वर्षे आणि ५ महिने

दरम्‍यान, गर्भवती मुलीने एका मुलाला जन्‍म दिला. त्‍यामुळे आरोपीची डीएनए चाचणीही घेण्‍यात आली. न्यायालयाने अल्पवयीन पीडिता, तिची मावशी, वडील, पोलिस अधिकारी आणि डॉक्टरांसह एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. वैद्यकीय व्यावसायिकांनी पीडित मुलीचे मानसिक आरोग्य मूल्यांकन केले. यामध्‍ये पीडित मुलीचे मानसिक वय ११ वर्षे आणि ५ महिने असल्याचे स्‍पष्‍ट झाले.

बलात्काराच्या प्रकरणांमध्ये केवळ ‘डीएनए’ पुरावा निर्णायक नाही

या खटल्‍याची सुनावणी पोक्सो न्‍यायालयाच्‍या विशेष न्‍यायाधीश सीमा जाधव यांच्‍यासमोर झाली. न्‍यायाधीशांनी स्‍पष्‍ट केले की, “डीएनए चाचणीमध्‍ये आरोपी हे पीडितेच्‍या गर्भाच्या जैविक वडिलांशी संबंध जोडलेला नाही. मात्र बलात्काराच्या प्रकरणांमध्ये केवळ डीएनए पुरावा निर्णायक मानला जाऊ शकत नाही. तो आरोपांच्या खात्रीचा पुरावा म्हणून वापरला जातो. दोघा आरोपीने केलेले कृत्‍य घृणास्पद आहे. पीडितेवर त्याचा गंभीर मानसिक व शारीरिक परिणाम झाला असून, तिच्या आयुष्यावर कायमचा डाग राहिला आहे, असे स्‍पष्‍ट करत न्‍यायाधीशांनी दोघा आरोपींना २० वर्षांच्या सश्रम कारावास आणि २५ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा : 

Back to top button