सव्वापाच हजार मेगावॅटचे ऊर्जाप्रकल्प करार; सौर आणि पवनऊर्जा निर्मिती क्षमता वाढणार | पुढारी

सव्वापाच हजार मेगावॅटचे ऊर्जाप्रकल्प करार; सौर आणि पवनऊर्जा निर्मिती क्षमता वाढणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  औष्णिक वीजनिर्मितीत अग्रेसर कंपनी असलेल्या महानिर्मितीने राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केले आहेत. नवीकरणीय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण असून, त्यास अनुसरून हे करार करण्यात आले.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एस. जे. व्ही. एन. मर्यादित (पूर्वाश्रमीची सतलज जलविद्युत निगम मर्यादित) या कंपनीसोबत ५ हजार मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प, महाऊर्जासोबत १२० मेगावॅट सौर व पवनऊर्जा प्रकल्प, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यासमवेत १०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी करार केले.

एकूण ५, २२० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्प नियोजनाद्वारे राज्यातील विविध ठिकाणी सौर- उदंचन जलविद्युत आणि पवनऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. तिन्ही सामंजस्य करारांवर महानिर्मितीच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी स्वाक्षरी केली. एस. जे. व्ही. एन. मर्यादित यांच्या वतीने गीता कपूर, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी, तर महाऊर्जाच्या वतीने महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वाक्षरी केली.

Back to top button