दोन हजारांच्या नोटेबाबत निर्णय चुकीचा : पी. चिदंबरम | पुढारी

दोन हजारांच्या नोटेबाबत निर्णय चुकीचा : पी. चिदंबरम

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील भाजप सरकार नऊ वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दोन हजाराची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याचा निर्णयही चुकीचाच होता, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत आहे. सरकार संविधानानुसार चालताना दिसत नाही. राज्य सरकारांच्या कार्यकारी अधिकारांमध्ये कपात करण्यात आली आहे. बिगर भाजपशासित राज्यांचे राज्यपाल व्हाईसरॉयसारखे वागत आहेत. संसदीय नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले जात आहे. खोट्या केसेस, तपासाच्या धमक्या देऊन राज्य सरकारांना अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा राबत आहेत. पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंका या शेजारी देशांशी आपले संबंध चांगले राहिले नाहीत. चीन सीमेलगत नवीन वसाहती उभारत आहे.

अर्थव्यवस्थेचा वेग कमी आहे. प्रचंड बेरोजगारी, महागाई हे ज्वलंत विषय आहे. बेरोजगारीचा दर सध्या 7.45 टक्के आहे. सामाजिक कलह, सांप्रदायिक संघर्ष, असहिष्णुता, द्वेष, भीती याने दररोज आपले जीवन बिघडत आहे, असेही ते म्हणाले.

Back to top button