अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा? | पुढारी

अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री व नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता भाजपच्या टार्गेटवर काँग्रेसचे बडे नेते असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगरमधील बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार कागदपत्रांसह उघड करणार असल्याचे जाहीर करीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी नांदेडमधील एक बडा नेताही ईडी चौकशीच्या फेर्‍यात येणार असल्याचे सांगितले. भाजप नेते किरीट सोमय्या हे 26 किंवा 27 तारखेला नांदेडमध्ये येणार असल्याचेही सांगितले. त्यांचा रोख सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होता.

अशोक चव्हाण यांनी मात्र देगलूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा खळबळ माजविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. केंद्रीय यंत्रणांचा भाजप गैरवापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आतापर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे नातेवाईक, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ हे महत्त्वाचे नेते ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. अनिल देशमुख यांना तर गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

आतापर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांवर आरोप झाले नव्हते. मात्र, आता काँग्रेसचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर येण्याचे संकेत आहेत. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? यंत्रणांचा असा गैरवापर योग्य नाही. देगलूर पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पाटील हे खळबळ माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं सख्य सर्वश्रुत आहे. एका पक्षात असतानाही त्यांचे एकमेकांशी कधी पटलं नाही. या दोन्ही नेत्यांमध्ये कायम शीतयुद्ध सुरू असते. मात्र विखे-पाटील यांनी अहमदनगरमधील एका बड्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्या हाती आले असून या नेत्याने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भरपूर महसूल गोळा केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी नाव घेणे टाळले असले तरी त्यांचा रोख हा थोरात यांच्या दिशेने असल्याचे उघड आहे.

Back to top button