राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका १ मार्चपासून होणार | पुढारी

राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका १ मार्चपासून होणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया १ मार्चपासून सुरु होणार आहेत.

सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्व पदावर आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढलेल्या आदेशानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्थाची (कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता) निवडणूक प्रक्रिया दिनांक १ मार्च २०२३ पासून सुरू करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी १ फेब्रुवारी २०२३ या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्राधिकरणाने सन २०२३ मधील ०१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी अनुक्रमे १५०, १२०, ६० व ६० दिवस अगोदर सुरु करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना आदेश देण्यात आ- लेले आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.

  • ज्या सहकारी संस्था निवडणुकीकरीता प्रारूप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, नियम १९६१ व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे आदेश देखील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आ- लेले आहेत. या आदेशानुसार अ, ब, क व ड वर्गातील अनुक्रमे ६३, १०१४, १०१६३ व ९३९८ अशा एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. अ वर्ग संस्थांमध्ये प्रामुख्याने २८ सहकारी साखर कारखाने, ३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, २६ सहकारी सुतगिरण्यांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Back to top button