विधान परिषद निवडणुकीत प्रथमच आप मैदानात! | पुढारी

विधान परिषद निवडणुकीत प्रथमच आप मैदानात!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: गोवा, गुजरात निवडणुकीनंतर सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा आम आदमी पार्टीने (आप) महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले असून, विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक व अमरावती, नाशिक पदवीधर अशा तीन मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.

राज्यात नागपूर, कोकण व मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, तर अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघ अशा ५ जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत असून, या निमित्ताने विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात आप प्रथमच उतरला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रा. देवेंद्र वानखेडे यांना पुरस्कृत करून त्यांना ‘आप’ ने ए, बी फॉर्म दिला आहे. याचबरोबर अमरावती पदवीधर मतदारसंघातून डॉ. भारती दाभाडे, तर नाशिक पदवीधरमधून ईश्वर पाटील यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी दिली. नागपूरमध्ये ४० हजार, तर अमरावती, नाशिक मतदारसंघात प्रत्येकी ३५ सदस्य नोंदणी करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. नवव्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून ‘आम आदमी पार्टी’ ला मान्यता मिळाली आहे. दिल्लीत ६२, पंजाबमध्ये ९३, गुजरातला ५, तर गोव्याला २ आमदार असे सध्याचे आपचे बलाबल आहे. महाराष्ट्रात आपचे एकूण १७५ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. त्यापैकी १२५ सदस्य विदर्भातील आहेत. त्याखालोखाल मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आहे.

Back to top button