मुंबई : निवडणुका लांबल्याने विकासकामांचा खोळंबा | पुढारी

मुंबई : निवडणुका लांबल्याने विकासकामांचा खोळंबा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : समस्या सोडवण्यासाठी झटपट भेटणारा लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक, पण मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे आता मुंबईत गेल्या नऊ महिन्यांपासून नगरसेवकच नाही. त्यामुळे शहर व उपनगरातील विविध नागरी समस्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांचीही भेट होत नसल्यामुळे नागरिकांच्या कामाचाही खोळंबा होत आहे.

महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे सध्या महापालिकेचे कामकाज प्रशासकांमार्फत सुरू आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य मुंबईकरांचा कोणी वाली उरलेला नाही, अशी परिस्थिती आहे. नगरसेवक दिवसभरामध्ये कधीही उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन थेट नगरसेवकांच्या कार्यालयात पोहोचत होते. अनेक नगरसेवक रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या कार्यालयात बसत होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी मुंबई महापालिका विभाग कार्यालयाची कधी पायरीच चढली नाही. त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या खात्यात जायचे याबाबत अनेक नागरिकांना काहीच माहिती नाही.

महापौर, उपमहापौर व पालिकेतील अन्य पदाधिकारी नसल्यामुळेही मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. अधिकाऱ्यांची वेळेत भेट झाली तर, तासाभरात समस्या सुटू शकते. मात्र अधिकारीच उपलब्ध होत नसल्यामुळे एकाच प्रश्नासाठी अनेकदा पालिकेच्या विभाग कार्यालयात जावे लागत असल्याचे मत अंधेरी सातबंगला परिसरातील नारायण सातव यांनी व्यक्त केले.

Back to top button