Share Market Today | चीनसह अमेरिकेत कोरोनाची धास्ती, सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरला | पुढारी

Share Market Today | चीनसह अमेरिकेत कोरोनाची धास्ती, सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरला

Share Market Today : वाढत्या कोरोनामुळे जागतिक बाजारातून कमकुवत संकेत आहेत. यामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३०० हून अधिक अंकांनी घसरून ६०,५०० वर होता. तर निफ्टी ८२ अंकांच्या घसरणीसह १८ हजारांवर आला. आजच्या टॉप लूजर्समध्ये एचयूएल, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, आयटीसी, मारुती, विप्रो, एलटी, टीसीएस यांचा समावेश आहे. तर सन फार्मा, एअरटेल, एसबीआय हे टॉप गेनर्सच्या यादीत होते. दरम्यान, काल बुधवारी दिवसभर शेअर बाजारात चढ-उतार पहायला मिळाला होता.

कोरोनाच्या धास्तीमुळे अमेरिकेतील शेअर बाजाराला धक्का बसला आहे. रात्रभर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांत सुमारे १ टक्क्यांची घसरण झाली. नॅस्डॅक कंपोझिट आणि S&P 500 अनुक्रमे १.३५ टक्क्यांनी आणि १.२ टक्क्यांनी घसरला, तर डाऊ जोन्स १.१ टक्क्यांनी खाली आला.

या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात नकारात्मक वातावरण आहे. चीनमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. चीन हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार देश आहे. पण येथे कोरोनाच्या उद्रेकामुळे तेलाच्या मागणीत सुधारणा होण्याची आशा धूसर बनली आहे. यामुळे तेलाच्या किमती घसरल्या आहेत.

एसजीएक्स निफ्टी घसरला आहे. जपानचा निक्केई 225 निर्देशांक १.३ टक्क्यांनी घसरला आहे. तर चीनचा शाघाई कंपोझिट ०.२ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.०३ टक्क्यांनी खाली आला आहे. (Share Market Today)

हे ही वाचा :

Back to top button