CIBIL Score | कर्ज घेताय, मग सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

CIBIL Score | कर्ज घेताय, मग सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

कोणतेही कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर अर्थात सिबिल स्कोअर (CIBIL Score) चांगला असणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर चांगला राहावा यासाठी त्यावर सतत लक्ष असल्याने गरजेचे असून त्याबाबाबतची जागरूकता भारतीय नागरिकांत वाढत चालली आहे.

'ट्रान्स युनियन सिबिल'च्या मते, ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 या काळात सुमारे 23.8 दशलक्ष नागरिकांनी प्रथमच क्रेडिट प्रोफाईलवर लक्ष ठेवण्यासाठी नोंदणी केली आहे. ही संख्या ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या काळात नोंदणी केलेल्या संख्येच्या 83 टक्के अधिक आहे.

नियमित देखरेख हवी

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तिमाहीतून एकदा क्रेडिट स्कोअर पाहण्याची सवय भारतीय नागरिकांनी ठेवायला हवी. 'ट्रान्स युनियन सिबिल'चा अहवालही हेच दर्शवतो की, नियमितपणे क्रेडिट प्रोफाईल पाहण्याबाबत नागरिकांनी जागरूक असायला हवे. केवळ कर्ज घेण्यासाठी नव्हे, तर कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी आपला क्रेडिट स्कोअर पात्र असायला हवा. या सवयीमुळे आर्थिकविषयक अनेक घडामोडींबाबत आपण सजग राहू शकतो. त्यापैकीच चोरी हा एक गंभीर मुद्दा आहे. आपण कर्ज घेतल्याचे सांगून एखादा ठगसेन आपली फसवणूक करू शकतो. मात्र क्रेडिट प्रोफाईलवर नियमितपणे लक्ष ठेवल्यास हा प्रश्न वेळीच निकाली लागू शकतो. फसवणुकीचा संशय आल्यास तत्काळ क्रेडिट ब्यूरो आणि बँक अधिकार्‍याकडे तक्रार करा.

एखादा कर्जदार हा आपला क्रेडिट स्कोअर चांगला असेल, असे गृहीत धरतो. मात्र कर्ज घेण्याच्या वेळी क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर हा सर्वसाधारण असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे हा व्यक्ती क्रेडिट स्कोअवर नियमितपणे देखरेख ठेवत होता आणि त्यात त्याला सुधारणा करण्याची संधी देखील होती. कर्ज प्रकरण मंजुर करताना आणि व्याजदर आकारणी करताना क्रेडिट स्कोअरचा परिणाम होतो. क्रेडिट स्कोर सध्या किती आहे त्यानुसार त्यात सुधारणा करण्याचा काळ लागू शकतो. कदाचित दोन ते तीन तिमाहीचा काळ लागू शकतो. क्रेडिट प्रोफाईलवर सतत लक्ष ठेवल्यास उणिवांबाबत सजगता येते आणि एखाद्या कर्ज प्रकरणात बँकेकडून कोणकोणते मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात, याचेही आकलन होते. एखादे पेमेंट आपल्याकडून करायचे राहून गेले असेल आणि ते आपल्या गावीही नसेल, काहीवेळा आपण पेमेंट केलेले असेल; परंतु प्रक्रियेमुळे वेळ लागला असेल तर त्याचाही परिणाम क्रेडिट प्रोफाईलवर होऊ शकतो.

नियमित तपासणी करा

क्रेडिट प्रोफाईल तपासणी आणि देखरेख करण्याची सवय बाळगा. या तपासणीत क्रेडिट स्कोअर चांगला असल्याचे लक्षात आले तर आपल्यात आत्मविश्वासन निर्माण होतो आणि कोणत्याही वेळेला आकर्षक व्याजदरावर कर्ज मिळण्यास मदत मिळते. जर सिबिल स्कोअर मध्यम किंवा कमी असेल, तर त्यात सुधारणा करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो.

दुसरे म्हणजे कर्ज घेतलेले असेल तर रिपेमेंटचे रेकॉर्ड तपासा. काही किरकोळ चुकांमुळे सिबिलवर नकारात्मक परिणाम होतो. अन्य व्यक्तीच्या आर्थिक व्यवहाराचे प्रतिबिंब हे काहीवेळा आपल्या सिबिल स्कोरअरवर पडू शकते. उदा. आपण जामीनदार असाल किंवा सहकर्जदार असाल, तर प्रमुख कर्जदाराने कर्जफेडीस अनियमिता ठेवली तर त्याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोअवर होतो. तिसरे म्हणजे डेमोग्राफिक सेक्शनमध्ये आपले नाव, जन्मातरीख, पत्ता, पॅनकार्ड नंबर यांसह अन्य नोंदी अचूक आहेत की नाही याची पडताळणी करायला हवी.

चौथे म्हणजे चौकशी विभागाची तपासणी करा. जर आपण कर्जासाठी अर्ज करत असू, तर बँकांकडून आपल्या क्रेडिट प्रोफाईलची तपासणी केली जाते. या प्रक्रियेचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. आपण कर्जासाठी विचारणा केली नसेल किंवा अर्ज दिला नसेल, पण चौकशीची नोंद झाली असेल तर कदाचित आपल्या क्रेडिट स्कोअरचा अन्य कोणीतरी गैरवापर करत असल्याचा धोक्याचा इशारा आपल्याला मिळतो.

पाचवे म्हणजे क्रेडिट प्रोफाईलमधील प्रत्येक कर्जाच्या मुद्दल रकमेची तपासणी करा. जर मुद्दल रकमेत विसंगती आढळून येत असेल, तर कदाचित व्याजदर वाढलेले असू शकतात किंवा दंडतरी आकारला गेला असेल किंवा अन्य आर्थिक विषयक मुद्दे असू शकतात आणि त्याची तपासणी करणे गरजेचे आहे.

योग्य पावले उचला

क्रेडिट स्कोअरमध्ये विसंगती आढळून येत असेल तर त्यात दुरुस्ती करा. क्रेडिट ब्यूरो आणि बँकांशी संपर्क साधून शंकांचे समाधान करून घ्या आणि दुरुस्ती करून घ्या. जर क्रेडिट रिपोर्टमध्ये एखादे पेमेंट चुकलेले दाखवत असेल, तर लवकरात लवकर पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, तुमच्या पेमेंट हिस्ट्रीचे क्रेडिट स्कोअरमध्ये 30 ते 40 टक्के स्थान असते. एखादी थकबाकी 90 दिवसांपेक्षा अधिक असेल, तर अशा प्रकारचे कर्ज हे खराब (राईट ऑफ) श्रेणीत टाकले जाते. मात्र हा दंड किंवा थकबाकी आपण चुकवल्यास सिबिल प्रोफाईलमधून 'राईट ऑफ' हा रिमार्क निघाला आहे की नाही, याची खातरजमा करा. काही वेळा आपल्या क्रेडिट प्रोफाईलमध्ये 'सेटलमेंट'चा रिमार्क असू शकतो. एखादेवेळी कर्जदाराकडून संपूर्णपणे थकबाकी भरली जात नसेल, तर बँकेकडून तडजोड करण्यासाठी काही ऑफर दिली जाते. म्हणजे शंभर रुपये थकबाकी असेल, तर 70 रुपये घेण्यास बँक राजी होते. परंतु अशा प्रकारची तडजोड किंवा सेटलमेंट हे आपल्या सिबिल स्कोअरवर परिणाम करते. यात सुधारणा करायची असेल, तर कर्जाचे संपूर्ण पैसे भरा आणि आपल्या क्रेडिट प्रोफाईलमधून सेटलमेंटचा टॅग काढून टाका.

हे लक्षात ठेवा

जुनी थकबाकी पूर्णपणे भरण्याचा प्रयत्न करा आणि भविष्यातही थकबाकी राहणार नाही, याची काळजी घ्या.

क्रेडिट कार्डवर मर्यादेपेक्षा अधिक खरेदी अणि व्यवहार करणे चुकीचे असून, त्यामुळे क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट लिमिटच्या 40 टक्क्यांपर्यंतच व्यवहार करा. त्यापेक्षा अधिक व्यवहार करण्याचे टाळा.

अर्ज नाकारला जाईल किंवा फेटाळला जाईल अशी स्थिती उद्भवू नये यासाठी पात्रता पाहूनच क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज करा.
कर्जासाठी अनेक ठिकाणी अर्ज केल्यानेदेखील क्रेडिट प्रोफाईलला फटका बसतो. कर्जाची खूप गरज आहे, असे संकेत या कृतीतून जातात.

सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज यात समतोल साधण्याचा प्रयत्न करा. असुरक्षित कर्जाचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.

क्रेडिट स्कोअर किती असावा?

कोणत्याही व्यक्तीचा चांगला क्रेडिट स्कोअर हा 800 किंवा त्यापेक्षा अधिक असावा, अशी अपेक्षा असते. अशा मंडळींना कर्ज मिळण्यास कोणतिही अडचण येत नाही. साधारण 700 पेक्षा कमी स्कोअर असणार्‍या मंडळींना कर्ज मिळण्याची शक्यता कमी राहते. यासाठी जामीनदाराचा शोध घेणे किंवा अन्य आर्थिक हमी देणे यासारख्या गोष्टी कराव्या लागतात. याशिवाय कमी सिबिल स्कोअर असल्यास जादा व्याजदर आकारणी होऊ शकते. 300 ते 549 सिबिल स्कोअर हा खराब मानला जातो, 550 ते 750 दरम्यानच्या स्कोअरला फेअर म्हणजे ठीक या श्रेणीतील स्कोअर (CIBIL Score) समजला जातो.

-राधिका विवलकर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news