फ्रिज उघडून आफताब रोज श्रद्धाचा चेहरा बघायचा : तपासात नवीन धक्कादायक माहिती | पुढारी

फ्रिज उघडून आफताब रोज श्रद्धाचा चेहरा बघायचा : तपासात नवीन धक्कादायक माहिती

नवी दिल्ली/मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वसईच्या श्रद्धा वालकरचा क्रूर खून करून तिचे 35 तुकडे करणार्‍या नराधम आफताब पूनावालाने विकृतीचे टोक गाठले होते, असे त्याच्या कबुली जबाबातून समोर आले आहे. फ्रिजमध्ये ठेवलेले श्रद्धाच्या शरीराचे रोज एक-दोन तुकडे तो रात्री उशिरा जंगलात फेकून यायचा. आल्यावर फ्रिज उघडून तो श्रद्धाचा चेहरा बघत असे. विकृतीचा कळस गाठणार्‍या आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतर आणखी एका तरुणीला घरी बोलावून मौज केल्याचेही आता समोर आले आहे.

श्रद्धा वालकर या 26 वर्षीय तरुणीचा आफताब पूनावालाने निर्घृण खून करीत तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचे सोमवारी उघडकीस आल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या प्रकरणातील आणखी तपशील आता समोर येत असून, आफताबने पापाची कबुली देताना आणखी नवीन माहिती दिली आहे. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर तो रोज एका काळ्या पिशवीतून एक-दोन तुकडे नेऊन जंगलात फेकायचा. त्याने श्रद्धाचे शिर फ्रिजमध्येच ठेवले होते. परतल्यावर फ्रिज उघडून तो श्रद्धाच्या चेहर्‍याकडे टक लावून बघत असे.

कबुलीजबाब देताना रडला

दिल्ली पोलिसांकडे आफताबने कबुलीजबाब दिला. त्याबाबत पोलिसांनी सांगितले की, आपल्याला हिंदी येत नाही, असे आफताब सांगतो. त्याच्याशी सगळा संवाद इंग्रजीतच करावा लागला. हत्या कशी केली आणि नंतर काय केले, याबाबत त्याने सविस्तर तपशील दिला. पोलिसांना माहिती देताना तो अनेकदा रडला.

गुगलवरून शोधली माहिती

पोलिस सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, 18 मे रोजी श्रद्धाचा आधी गळा दाबून खून केला. नंतर मृतदेह बाथरूममध्ये ठेवला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची आणि डीएनएचे पुरावे कसे नष्ट करायचे, हे तो गुगल आणि यू ट्यूबवर शोधत बसला. दुसर्‍या दिवशी त्याने नवा कोरा फ्रिज आणि नवा कोरा चाकू तसेच एक करवत वापरून श्रद्धाच्या देहाचे तुकडे केले. रक्ताचा थेंब सापडू नये व पोलिसांना तिच्या डीएनएचे नमुने मिळू नयेत, यासाठी सल्फर हायपोक्लोराईट हे रसायन वापरून घर स्वच्छ केले. त्यानंतर श्रद्धाच्या मित्र-मैत्रिणींना संशय येऊ नये म्हणून तो तिच्या इन्स्टाग्रामवरून त्यांच्याशी संपर्क ठेवत होता. श्रद्धाचा मोबाईल आफताबने महाराष्ट्रात आल्यावर फेकून दिला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

हत्येनंतर मैत्रिणीला बोलावले

श्रद्धाच्या संपर्कात येण्याआधी आफताब बंबल नावाच्या अ‍ॅपच्या माध्यमातून दिल्लीतील एका सायकोलॉजिस्ट तरुणीच्या संपर्कात आला. तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. नंतर श्रद्धाची ओळख झाल्यावर त्याने या तरुणीशी संपर्क कमी केला. श्रद्धाचा खून केल्यानंतर त्याने या तरुणीला फोन करून फ्लॅटवर बोलावून घेतले. तिच्याशी संबंधही ठेवले. धक्कादायक म्हणजे, त्यावेळी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्येच होते. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर या डेटिंग अ‍ॅपवरून त्याने आणखी एका मुलीशी ओळख वाढवत तिलाही जाळ्यात ओढले. तिलाही त्याने फ्लॅटवर येण्याची ऑफर दिली होती, असे समोर आले आहे. पोलिस आफताबच्या फोनमधील डेटा तसेच बंबल अ‍ॅपकडील डेटा तपासत
आहेत.

वसईतून मुंबईत घर हलवण्याच्या निमित्ताने आफताब 15 दिवसांपूर्वीच मुंबईला आला होता, असे आता समोर आले आहे. वसईच्या युनिक पार्क हौसिंग सोसायटीत तिसर्‍या मजल्यावर त्याच्या वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे. 15 दिवसांपूर्वी आफताबच्या कुटुंबाने सामानाची बांधाबांध करून घर हलवण्याचे काम सुरू केले. त्यावेळी आफताब तेथे आला होता. सोसायटीतील लोकांनी आफताबच्या वडिलांकडे विचारणा केली असता, त्यांनी आफताबला मुंबईत नोकरी मिळाली आहे, कंपनीने फ्लॅट दिला आहे. त्याला ये-जा करणे सोपे व्हावे म्हणून घर सोडत असल्याचे सांगितले.

श्रद्धाची मित्रांकडे कैफियत

लक्ष्मण नाडर आणि रजत शुक्ला या श्रद्धाच्या दोन मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब मारहाण करत असल्याचे व त्रास देत असल्याचे श्रद्धाने त्यांना सांगितले होते. आम्ही तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्लाही दिला होता; पण तिने त्याला नकार दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे, एका संभाषणात आपण तिला आफताबपासून वेगळी हो आणि निघून जा, असेही सांगितले होते; पण तिने ते शक्य नसल्याचे सांगितले होते.

Back to top button