शिंदे-फडणवीस सरकार चार महिन्यांतच कोसळणार : सुषमा अंधारे | पुढारी

शिंदे-फडणवीस सरकार चार महिन्यांतच कोसळणार : सुषमा अंधारे

मुंबई; वृत्तसंस्था :  राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येत्या चार महिन्यांतच कोसळेल, असे भाकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी केले. शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. त्यापैकी काही लवकरच स्वगृही परततील, असेही त्या म्हणाल्या.

केवळ तीन-चार महिन्यांतच शिंदे गटात धुसफुस सुरू झाली आहे. कृषिमंत्री दादा भुसे मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर पडताना चिडचिड करत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा लागला आहे. सरनाईकांची जागा भाजपला हवी आहे, त्यामुळेच त्यांची आमदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, सध्या आम्ही दोघेही विभक्त झालो आहोत. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे. भावना गवळी या शिंदे गटात आहेत; मात्र त्यांचे पती ठाकरे गटातच आहेत. भावनेपेक्षा कर्तव्य कधीही श्रेष्ठ असते. खा. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीरच होती. न्यायालयानेही ते मान्य केले आहे, असे अंधारे म्हणाल्या.

दीपाली सय्यद यांचा प्रवेश लांबणीवर

अभिनेत्री दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्या, तरी त्यांना भाजपचा विरोध असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेबद्दल त्यांनी माफी मागावी; तरच त्यांना शिंदे गटाने प्रवेश द्यावा, असा भाजपचा आग्रह असल्याने त्यांचा शिंदे गटातील प्रवेश रखडला असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, सय्यद यांचा शिंदे गटातील प्रवेश लांबणीवर पडल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

Back to top button