पीडित मुलीच्या मृत्यूने आरोपी दोषमुक्त होत नाही! विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्वाळा | पुढारी

पीडित मुलीच्या मृत्यूने आरोपी दोषमुक्त होत नाही! विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचाराच्या खटल्यात साक्ष नोंदवण्यापूर्वी अल्पवयीन पीडित मुलीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला म्हणून आरोपीला संशयाचा फायदा देता येणार नाही, असे स्पष्ट करत लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतंर्गत (पोक्सो) विशेष न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावे आणि पीडितेने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अन्वये न्यायदंडाधिकार्‍यांसमोर दिलेल्या जबाब ग्राह्य धरून आरोपीला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवले. त्याला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पीडित मुलगी आठ वर्षांची असताना तिच्यावर परिसरात राहणार्‍या आरोपीने लैंगिक शोषण केले होते. मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. खटला प्रलंबित असताना दुर्दैवाने कर्करोगाच्या आजारात मुलीचा दोन वर्षांत मृत्यू झाला. या खटल्याची विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश प्रीती घुले यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पीडित मुलीचा मृत्यू झाल्याने आरोपीविरोधात थेट पुरावा नाही, असा दावा करून आरोपीला दोषमुक्त करण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयाने ती फेटाळून लावली. आरोपीविरोधात थेट पुरावा नसले, तरी याप्रकरणी आरोपी विरोधातील परिस्थितीजन्य पुरावे आणि पीडितेच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश प्रीती घुले यांनी आरोपीला दोषी ठरवून वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

न्यायालय काय म्हणाले ?

पीडितेचा मृत्यू झाला म्हणजे आरोपीला निर्दोषत्व सिद्ध झालेले असे नाही. पीडितेने महानगर दंडाधिकार्‍यांसमोर जबाब नोंदवला त्यावेळी सुस्थितीत होती. कर्करोग निदान झाल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ती खटल्यात साक्ष देऊ शकली नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. आरोपीने केलेल्या अत्याचाराबाबत पीडितेच्या आईला सांगितल्यावर आरोपीविरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवली होती. मुलीच्या अशाप्रकारे झालेल्या मृत्यूमुळे तिच्या आईने खूप काही सोसले आहे.

Back to top button