मुंबई : रश्मी शुक्ला यांच्याकडे पुन्हा मुंबईचे पोलिस आयुक्तपद? | पुढारी

मुंबई : रश्मी शुक्ला यांच्याकडे पुन्हा मुंबईचे पोलिस आयुक्तपद?

मुंबई; वृत्तसंस्था :  आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाच्या आरोपातून सहीसलामत बाहेर पडल्याने त्यांंच्याकडे पुन्हा एकदा मुंबईचे पोलिस आयुक्तपद सोपविले जाण्याची शक्यता आहे.

पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यापाठोपाठ आता मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यातही त्यांना दिलासा मिळाला आहे. राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात कुलाबा पोलिसांनी खटला चालविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र त्यांचा प्रस्ताव गुरुवारी राज्य सरकारने फेटाळला. मुंबईतील हे प्रकरण शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील होते.

सीआरपीसीच्या कलम 197 च्या तरतुदींनुसार, सरकारी अधिकार्‍यावर गैरकृत्य केल्याचा आरोप असल्यास त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. त्याप्रमाणे कुलाबा पोलिसांनी हा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र शासनाने हा प्रस्ताव फेटाळल्याने पुन्हा एकदा शुक्ला यांचे नाव मुंबईच्या आयुक्तपदासाठी चर्चेत आले आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात ठपका ठेवण्यात आला होता.

Back to top button