सायरस मिस्त्री यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?, शवविच्छेदन अहवाल आला समोर | पुढारी

सायरस मिस्त्री यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?, शवविच्छेदन अहवाल आला समोर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जवळ झालेल्या भीषण अपघातात टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री (former Tata Group chairman Cyrus Mistry) आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यू नेमका कशामुळे याचे कारण समोर आले आहे. डोक्याला गंभीर आघात आणि अनेक अवयवांना बाहेरुन आणि आतून झालेल्या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून (autopsy) निष्पन्न झाले आहे. रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात मर्सिडीज एसयूव्हीच्या मागील सीटवर बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज वरळी येथील स्मशानभूमीतअंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्राथमिक शवविच्छेदन अहवालात असे म्हटले आहे की, सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या छातीत गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रासायनिक विश्लेषणाचे निष्कर्ष आल्यानंतर अंतिम अहवाल समोर येईल.

सोमवारी मध्यरात्री पालघरच्या कासा उपजिल्हा रुग्णालयातून त्यांचे पार्थिव शासकीय जेजे रुग्णालयात आणण्यात आले. रात्री २.३० पर्यंत शवविच्छेदन पूर्ण झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली. रुग्णालयाने शवविच्छेदनाच्या निष्कर्षांवर अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. पण शवविच्छेदनावर प्राथमिक अहवाल तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

मिस्त्री यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्या छातीत गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. दोघांच्याही डोक्याला, छातीला आणि हातपायांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. त्यांच्या अनेक अवयवांना दुखापत झाली होती. यामुळेच त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असे एका सूत्राने सांगितले.

जेजे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे की, व्हिसेराचे नमुने कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) मध्ये पाठवले जातील आणि एफएसएलने रासायनिक विश्लेषणाचे निष्कर्ष सादर केल्यानंतर शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल तयार केला जाईल.

हे ही वाचा :

 

Back to top button