रतन टाटांची पहिली पसंती होते सायरस मिस्त्री

रतन टाटांची पहिली पसंती होते सायरस मिस्त्री
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  23 नोव्हेंबर 2011 बुधवारची सायंकाळ… टाटा समूहाला वारस मिळाल्याची बातमी जगभर वार्‍यासारखी पसरली. विशेष म्हणजे, हा वारस टाटा कुटुंबातला नव्हता. पुढल्या काही तासांतच 43 वर्षांचा एक युवक सायरस पालोनजी मिस्त्री याला एक नवी व झळाळी असलेली ओळख मिळाली होती. अविवाहित रतन टाटा यांचा वारस जाहीर होताच शेअर बाजारात टाटाच्या समभागांनाही उसळी आली होती. टाटाच्या बाजार भांडवलातही तब्बल 52 अब्ज रुपयांनी वाढ झाली. रतन टाटा यांनी डिसेंबर 2012 मध्ये 'टाटा सन्स'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लगोलग याच महिन्यात 28 डिसेंबर 2012 रोजी सायरस मिस्त्री यांच्याकडे टाटांनी हे पद सोपविले होते. सायरस यांना रतन टाटांची पहिली पसंती होती. ते टाटा सन्सचे सर्वात तरुण चेअरमन ठरले होते.

मिस्त्री कुटुंबाची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के भागीदारी आहे. नियुक्‍तीनंतर पुढे चारच वर्षांनी वाद उद्भवले. या वादांची परिणती म्हणून सायरस मिस्त्री यांना 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेक सवाल उपस्थित केले होते. सायरस यांच्या कामाची पद्धत टाटा समूहाच्या कार्यसंस्कृतीशी सुसंगत नाही, इथपर्यंत या प्रश्‍नांची मजल गेली होती. शेवटी संचालक मंडळाने सायरस यांच्यावर अविश्‍वास व्यक्‍त केल्याचे टाटा सन्सने सार्वजनिकपणे जाहीर केले होते. पुन्हा रतन टाटा यांची टाटा सन्सच्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्‍ती झाली होती. पुढे 12 जानेवारी 2017 रोजी एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाली. सायरस हे 150 हून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा असणार्‍या टाटा समूहाचे 6 वे अध्यक्ष होते. रविवारी त्यांचे निधन झाले.

रतन टाटांचे भाऊही मागे पडले

रतन टाटांचे उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा स्पर्धेत पुढे होते. शिवाय इंदिरा नुई यांच्यासह अन्य 14 लोकांचाही विचार सुरू होताच. मुलाखती झाल्या. कामाची पद्धत, अनुभव, योग्यता अशा अनेकविध कसोट्या झाल्या. अखेर सर्वसंमतीने सायरस यांची निवड झाली होती. सायरस हे नात्याने नोएल टाटांचे मेहुणे होते.

शापूरजी पालोनजी मिस्त्री समूह

देशातील अत्यंत जुनी आणि विश्‍वासार्ह कंपनी म्हणून या समूहाचे नाव आहे. गेल्या शंभर वर्षांपासून मुंबईच्या पाण्याची गरज पूर्ण करणार्‍या मालबार हिल रिझर्वायरची उभारणी याच कंपनीने केली होती. ताज इंटर कॉन्टिनेंटल हॉटेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भवन, एचएसबीसी भवन, मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियम, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमही याच कंपनीने साकारलेले आहे.

टाटा आणि पालोनजींची सोबत

पालोनजी मिस्त्री दीर्घकाळ टाटा संचालक मंडळावर होते. त्यांचे वडील शापूरजी पालोनजी मिस्त्री यांनी 1930 मध्ये एफई दिनशॉ इस्टेट मध्ये 12.5 टक्के वाटा खरेदी केला होता. नंतर तो वाढवून त्यांनी 16.5 टक्क्यांपर्यंत नेला. टाटा सन्समध्ये पालोनजी मिस्त्री यांचे कुटुंब हे टाटा कुटुंबाव्यतिरिक्‍त सर्वांत मोठे भागीदार आहे. भागीदार कायमस्वरूपी राहावी म्हणून 1990 च्या सुरुवातीला पालोनजी यांनी 60 कोटी रुपये टाटा सन्समध्ये गुंतवले होते.

सायरस म्हणजे काय?

सायरस हा मूळ ग्रीक शब्द आहे. ईश्‍वराचे रूप आणि सूर्य असे सायरस या शब्दाचे दोन अर्थ आहेत. सायरस हे एका अर्थाने ऐतिहासिक नाव आहे. प्राचिन पर्शिया (आताचे इराण) देशात या नावाचे अनेक राजे होऊन गेलेत. पाचव्या शतकातील पारशीधर्मीय सम्राट 'सायरस द ग्रेट' याने तर बॅबिलॉन जिंकून तेथील ज्यूंना (यहुदी) स्वातंत्र्य मिळवून दिले होते. जगाचा एक मोठा भाग सायरसने जिंकला होता. सिकंदर द ग्रेटशी त्याची तुलना केली जाते. सायरस मिस्त्री हेही पारशी होते. कट्टरवाद्यांकडून पर्शियातील छळानंतर त्यांचे पूर्वज भारतात आले होते.

जन्म आणि शिक्षण

सायरस पालोनजी मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी मुंबईत झाला होता. ते शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष पालोनजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र होते.
सायरस यांनी लंडनमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनाची पदवी घेतली. व्यवस्थापनात त्यांनी लंडनच्या बिझनेस स्कूलमधून मास्टर डिग्रीही संपादन केली होती.

सायरस मिस्त्री यांच्या खासियती

1) साधेपणा
टाटा समूहाचे सर्वेसर्वा बनल्यानंतर सायरस मुंबईतील समूहाच्या 'बॉम्बे हाऊस' या मुख्यालयात पोहोचले तेव्हा शर्ट-पँटवर आले होते. त्यांच्या स्वागताला आलेले सारे मात्र सुटाबुटात होते. सदर्‍याच्या बाह्याही वळवलेल्या होत्या. सदर्‍याची काही बटणे खुली होती.
2) दुसरे रतन टाटाच
सतत बातम्यांत असणारे रतन टाटा हे प्रत्यक्षात नेहमी जमिनीवर असतात. टाटांना अनेक लोक 'शाय टाईप' म्हणून ओळखतात. बडेजाव त्यांच्यात नाहीच. सायरस मिस्त्री यांना जवळून ओळखणार्‍या लोकांच्या मते सायरस म्हणजे याबाबतीत रतन टाटांचीच दुसरी कॉपी! दोघांचे स्वभाव आणि लोकांना भेटण्याची पद्धत जवळपास सारखीच.
3) सर्वांत वेगळे तरी सामान्य
मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉनन या कॉन्व्हेंट शाळेत सायरस शिकले. इथे शिकणारी जवळपास सगळीच मुले संपन्न परिवारांतील, पण अत्यंत महागड्या मोटारीतून शाळेत येणारे सायरस इथे वेगळे ठरत… या उपर एकदा वर्गात दाखल झाले, की इतर मुलांप्रमाणेच त्यांचे वागणे-बोलणे असे. ते मन लावून शिकत आणि तसाच अभ्यासही करत असत.
4) रतन टाटांची पहिली पसंती
सायरस यांच्या निवडीनंतर रतन टाटा म्हणाले होते, ही निवड समूहाचा एक दूरद‍ृष्टीचा निर्णय आहे. सायरस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नवे शिखर गाठू. सायरस हे ऑगस्ट 2006 पासून टाटा सन्सच्या संचालक मंडळात आहेत आणि माझा त्यांच्या क्षमतेवर, बुद्धिमत्तेवर आणि नम्रतेवर सर्वाधिक विश्‍वास आहे.
5) वाट्याला टाटांचा वारसा
रतन टाटा यांच्या उत्तराधिकारी निवडणे ही टाटा सन्ससाठी मोठी जटिल बाब होती. ऑगस्ट 2010 मध्ये त्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. स्वत: सायरसही या समितीत होते. समितीच्या सदस्यांनी योग्य व्यक्‍ती मिळावी म्हणून अवघे जग धुंडाळले. डझनोगणती बैठका घेतल्या होत्या, हे विशेष!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news