Cyrus Mistry : कोण होते सायरस मिस्त्री? टाटा ग्रुपशी त्‍यांचे नाते कसे बिनसले? | पुढारी

Cyrus Mistry : कोण होते सायरस मिस्त्री? टाटा ग्रुपशी त्‍यांचे नाते कसे बिनसले?

मुंबई : पुढारी ऑनलाईन : टाटा सन्सचे माजी अध्‍यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे आज ( दि. ४ ) पालघरजवळील अपघातात निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. देशातील ख्‍यातनाम उद्‍योगपती अशी ओळख असणार्‍या सायरस मिस्त्री यांच्‍या आकस्‍मिक मृत्‍यूने देशातील उद्‍योग जगताला हादरा बसला आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीमध्‍ये देशातील प्रमुख उद्योग समूह टाटा ग्रुपचे ते अध्‍यक्ष होते. जाणून घेवूया त्यांच्या कारर्कीदीविषयी…

टाटा आणि मिस्त्री कुटुंबातील नाते…

सायरस मिस्त्री यांचा जन्‍म ४ जुलै १९६८ रोजी ख्‍यातनाम उद्‍योग समूह शपूरजी पालोनजी मिस्त्री कुटुंबात झाला. सायरस यांच्‍या आई मुळच्‍या आयरिश. सायरस यांचा जन्‍म आर्यलंडमध्‍येच झाला होता. टाटा आणि मिस्त्री हे दोन्‍ही पारसी कुटुंब. शपूरजी पालोनजी अँड कंपनीचे पलोनजी मिस्त्री यांना सायरस आणि अलू ही दोन अपत्‍य. टाटा समुहाचे माजी अध्‍यक्ष रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांचा विवाह अलू मिस्त्री हिच्‍याशी झाला. अलू ही पलोनजी मिस्त्री यांची मुलगी तर सायरस मिस्त्री यांची बहिण आहे.

सायरस यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. यानंतर त्‍यांचे माध्‍यमिक आणि अभियांत्रिकी (सिव्हील इंजिनिअरींग) पदवी शिक्षण लंडनमध्ये झाले. यानंतर त्यांनी लंडन बिझनेस स्‍कूलमध्‍ये पदवीत्त्युर शिक्षण घेतले. सायरस मिस्त्री यांची १९९१मध्‍ये शपूरजी पालोनजी अँड कंपनीच्‍या संचालकपदी नियुक्‍ती झाली. तीन वर्षांनंतर ते कंपनीचे मुख्‍य संचालक झाले.

सायरस यांच्‍या नेतृत्‍वाखाली शपूरजी पालोनजी ग्रुपने घेतली भरारी

देशातील बांधकाम व्‍यवसायातील मोठी कंपनी म्‍हणून ‘शपूरजी पालोनजी’ची ओळख आहे. वस्‍त्रोद्‍योग, बांधकाम क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्‍ये या कंपनीचे जाळे पसरले आहे. सायरस यांच्‍या नेतृत्‍वाखाली या कंपनीने भरारी घेतली. त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली शपूरजी पालोनजी अँड कंपनीची उलाढाल अडीच अब्‍ज डॉलर एवढी झाली. सर्वात उंच निवासी टॉवर, सर्वात मोठे रेल्‍वे पूल आणि मोठ्या बंदरांच्‍या निर्मितीच्या कामात ही  कंपनी अग्रेसर आहे.

सायरस यांचे वडील पलोनजी मिस्‍त्री हे टाटा सन्‍स कंपनीत संचालक पदावर कार्यरत होते. तसेच टाटा समुहाचे मुख्‍यालय अशी ओळख असणार्‍या बॉम्‍बे हाऊसमधील लोकप्रिय चेहरा अशीही त्‍यांची ओळख होते. टाटा समुहावर त्‍यांचा प्रभाव होता. त्‍यांच्‍यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा समुहात कार्यरत झाले. टाटा सन्‍सची धुरा हाती घेण्‍यापूर्वी सायरस यांनी टाटा एलक्‍सी आणि टाटा पॉवरमध्‍ये संचालक म्‍हणून त्‍यांनी काम पाहिले होते.

Cyrus Mistry: २०१२ मध्‍ये टाटा समुहाचे अध्‍यक्ष

२०१२मध्ये रतन टाटा यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर सायरस मिस्त्री टाटा सन्सच्या सहावे चेअरमनपदी नियुक्त झाले. २०१२ ते २०१६ या कालावधीत सायरस हे टाटा समुहाचे अध्‍यक्ष होते. मात्र या चार वर्षांच्‍या काळात त्‍यांनी घेतलेल्‍या काही निर्णयांमुळे रतन टाटा यांना पुन्‍हा समुहाची धुरा आपल्‍या हाती घ्‍यावी लागली होती.

२०१६ मध्‍ये टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी

सायरस मिस्त्री यांची ऑक्टोबर २०१६मध्ये टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी मिस्त्री यांच्या वतीने त्याच्या परिवारातील ‘सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्प’ने ‘टाटा सन्स’च्या निर्णयाविरुद्ध ‘एनसीएलटी’च्या मुंबई खंडपीठात दावा दाखल केला. या कंपन्यांच्या मते ‘टाटा सन्स’च्या चेअरमनपदावरून मिस्त्री यांची करण्यात आलेली हकालपट्टी कंपनी कायद्याला धरून नव्हती. त्यांनी ‘टाटा सन्स’च्या व्यवस्थापनावर आणि रतन टाटा यांच्यावरही आरोप केले. मात्र, जुलै २०१८मध्ये ‘एनसीएलटी’ने त्यांचा दावा रद्दबातल ठरवला.

‘एनसीएलटी’ने ९ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निर्णयात ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळाला मिस्त्री यांना चेअरमन पदावरून हटविण्याचे अधिकार असल्याचे म्हटले होते. कंपनीच्या समभागधारकांचा आणि संचालक मंडळाचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत झाल्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा :

 

Back to top button