हरिहरेश्वरमध्ये आढळलेली संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेची : फडणवीसांची विधानसभेत माहिती

पुढारी ऑनलाईनडेस्क : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये आढळलेली संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. त्यामुळे या बोटीचा दहशतवादाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या बाेटीमध्ये  एके-47 रायफल्स व रायफल्‍सचा दारूगाेळी तसेच बाेटींशी संबंधीत कागदपत्रे आढळून  आली आहेत.  ही घटना निदर्शनास येताच तात्‍काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, या बोटीचे नाव ‘लेडीहान‘ याची मालकी ऑस्‍टेलियन नागरिक हाना लाँर्डरगन या महिलेची आहे. तिचा पती जेम्‍स हॉबर्ट या बोटीचा कप्तान असून ही बोट मस्‍कतहून युरोपकडे जाणार होती. दि. 26 जूनला रोजी या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल केला. यानंतर एका कोरीयन युध्द नौकेने या बोटीवरील सर्व खलाशांची सुटका करून त्यांना ओमानला पाठविले. तसेच समुद्राच्या लाटेमूळे यास टोईंग करता आले नाही. आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामूळे ही बोट हरिहरेश्वर किना-यावर आली, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाकडून मिळाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच ही प्राथमिक माहिती आहे. भारतीय तटरक्षक दलाशी संपर्क केला आहे. केंद्रीय यंत्रणा अधिक तपास करत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव राज्यासह किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.  दरम्यान संशयित बोटीसंदर्भात चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

 

 

Exit mobile version