घरकाम करण्यासाठी आणून नवी मुंबईत वेश्या व्यवसायाला जुंपले | पुढारी

घरकाम करण्यासाठी आणून नवी मुंबईत वेश्या व्यवसायाला जुंपले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईमध्ये घरकामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून परराज्यातून आणत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणार्‍या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेतील अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांनी नवी मुंबईतील नेरुळमध्ये असलेल्या शिरवणे गावात आणि जुईनगरमध्ये ही कारवाई करत 17 महिलांची सुटका करुन 9 वेश्या दलालांना बेड्या ठोकल्या आहेत.

यातील एक पीडिता 4 ऑगस्ट रोजी अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाकडे मदत मागण्यासाठी आली. तिने नवी मुंबईतील नेरुळमध्ये असलेल्या शिरवणे गाव, जुईनगरमध्ये राजू आणि साहील नावाच्या व्यक्ती महिलांना विविध राज्यांतून मुंबईत घरकामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणतात. महिला मुंबईत आल्यानंतर त्यांना विविध ठिकाणी कोंडून ठेवून मारहाण करत धमकी देत त्यांना हॉटेल्स, लॉजवर जबरदस्तीने पाठवून वेश्याव्यवसायात ढकलत असल्याची माहिती तिने दिली. याची गंभीर दखल घेत अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाने तपास आपल्याकडे घेतला.

पोलीस निरीक्षक अनिता कदम यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार करुन गुन्हेशाखेने या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण 17 बळीत महिलांची सुटका करुन 9 वेश्यादलालांना ताब्यात घेतले. या आरोपींजवळून 3 हजार 750 रुपयांची रोख रक्कम आणि 56 हजार रुपये किंमतीचे 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान, बळीत महिलांसह त्यांचा अल्पवयीन भाऊ याला सुरक्षित ताब्यात घेत त्यांना महिला सुधार गृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button