भिवंडीत रंगणार तिरंगी लढत | पुढारी

भिवंडीत रंगणार तिरंगी लढत

दिलीप शिंदे

मुस्लिम, आगरी, कुणबी आणि आदिवासी मतदारांचे वर्चस्व असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघात आतापर्यन्त झालेल्या निवडणुकीत आगरी समाजाच्या खासदारांनी बाजी मारलेली आहे. काँग्रेस बालेकिल्ल्यात भाजपाचे खासदार कपिल पाटील हे सलग दोनदा संसदेत पोहचले आणि ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाले. पुन्हा मतांची विभागणी टाळण्यास विरोधी पक्ष अपयशी ठरल्याने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल.

भिवंडी लोकसभा मतदार संघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भिवंडी, कल्याणमधील मुस्लिम मतदारांमुळे हा मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यामुळे भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आवाज बुलंद केला. मात्र मागील दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भिवंडीची जागा पदरात पाडून घेतली. त्याकरिता शिवसेना शिंदे गटातून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे या सक्षम आणि आगरी नेत्याच्या हाती राष्ट्रवादीची तुतारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे कपिल पाटील आणि राष्ट्रवादीचे बाळ्या मामा म्हात्रे या आगरी उमेदवारांमधील लढत काट्याची होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भिवंडी लोकसभेत सहापैकी पाच आमदार हे महायुतीचे असून इंडिया आघाडीचा एकच आमदार आहे. त्यामुळे गेली दहा वर्ष भाजपचा झेंडा भिवंडीवर फडकत राहिलेला आहे. 2009 मध्ये काँग्रेसचे खासदार सुरेश टावरे यांनी भाजपचे उमेदवार जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी मनसेचे देवराज म्हात्रे यांनी एक लाख 7 हजार मते घेतली तर कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांना 77 हजार 769 मते पडली होती. समाजवादी पार्टीचे आर. आर. पाटील यांना 32 हजार 767 मते मिळाली होती. चार आगरी उमेदवार असतानाही काँग्रेसचे टावरे यांनी 41 हजार 364 मतांच्या फरकाने विजय मिळविला होता.

2014 च्या निवडणुकीत समीकरणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कपिल पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढविली आणि पहिल्यांदा भिवंडीत कमळ फुलले. भिवंडी आणि कल्याणमधील मुस्लिम बहुल भागात स्वतःची यंत्रणा राबवून काँग्रेसला धोबीपछाड दिला. काँग्रेसने कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी देऊन मतांची समीकरणे मजबूत केली होती. मनसेने बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देऊन तिरंगी लढत घडवून आणली होती. मनसेला 93 हजार 647 मते मिळाली. तरी ही भाजपचे कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याने तब्बल 1 लाख 9 हजार 450 मतांच्या फरकाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. उमेदवार आयात करण्याची चूक दुरुस्त करीत काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सुरेश टावरे यांना रिंगणात उतरविले.

मात्र भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आपली जादू कायम ठेवत तब्बल 1 लाख 56 हजार 329 मतांच्या फरकाने काँग्रेसचा पराभव करीत भिवंडीचा गड राखला. गेल्या तिन्ही निवडणुकीत आगरी समाजाच्या उमेदवारांचे वर्चस्व राहिलेले दिसून येते. वास्तविक भिवंडी मतदार संघात 20 लाख 40 हजार मतदार असून त्यामध्ये सर्वाधिक कुणबी, मुस्लिम मतदारांची संख्या आहे. तरीही आगरी समाजाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. मतदारांनी काँग्रेसला दोनदा नाकारल्याने भिवंडीची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयन्त केले. मात्र बाळ्या मामाला दिलेला शब्द शरद पवार यांनी खरा केल्याने सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादीने आगरी कार्ड खेळले असून कुणबी कार्डच्या माध्यमातून सांबरे हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत वादावर पडदा टाकण्याचे प्रयन्त संबंधित नेत्यांकडून केले जात आहेत. या नाराजीचा फायदा कोण उचलतो, यावर भिवंडीतील सामना उत्तरोउत्तर रंगत जाईल.

Back to top button