केदार दिघे यांना मुंबई पोलिसांचे चौकशीसाठी समन्स | पुढारी

केदार दिघे यांना मुंबई पोलिसांचे चौकशीसाठी समन्स

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिघे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला धमकावल्याचा गंभीर आरोप आहे. याच आरोपानुसार केदार दिघे यांची चौकशी होणार आहे.

बलात्कार पीडित तरूणीला धमकावल्याप्रकरणी केदार दिघे यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक तपास पूर्ण केला आहे. यात पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. सोबतच पोलिसांनी संबंधितांचे फोन कॉल्सचे तपशील मागवून तपास सुरू केला आहे. याबाबत अधिक चौकशी करुन जबाब नोंदविण्यासाठी केदार दिघे यांना समन्स बजावण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार २३ वर्षीय तरुणी खासगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर आहे. ती लोअर परळमधील रेजीस हॉटेलमध्ये येणाऱ्या गेस्टना अटेन्ड करून क्लब मॅरेट मेम्बरशीपबाबत माहिती देण्याचे काम करते. २८ जुलैला तिला यातील आरोपी रोहित कपूर याने क्लब मेरेट मेम्बरशीप घेतो, असे सांगून तिला सेंट रेजीस हॉटेलमध्ये जेवणासाठी नेले.

जेवण झाल्यानंतर मेम्बरशीपचे पैसे देण्याच्या बहाण्याने तो थांबलेल्या रुममध्ये येण्यास भाग पाडले. तरुणी त्या रुममध्ये गेली असता त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीने घाबरुन या घटनेची वाच्यता केली नाही. परंतु, ३१ जुलैला तिने ही घटना तिच्या मित्रांना सांगितली आणि आरोपी रोहित कपूर याला व्हॉट्सअपद्वारे मॅसेज करून याबाबत जाब विचारला.

कपूर याने तिचे व्हॉट्सअॅप ब्लॉक केले. त्यानंतर तिने १ ऑगस्ट रोजी तिच्या मित्रांच्या मार्फत आरोपी कपूर याला पुन्हा विचारणा केली असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. आरोपी रोहित कपूर याने त्याचा मित्र आरोपी केदार दिघे याचे मध्यस्थीने पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करणेबाबत सांगितले. तक्रारदार महिलेने त्याला नकार दिला असता आरोपी केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारदार तरूणीच्या जबाबावरुन ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे आरोपी रोहित कपूर आणि केदार दिघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button