शिवसेनेतील अंतर्गत वाद भाजपची खेळी; इम्तियाज जलील यांचा दावा | पुढारी

शिवसेनेतील अंतर्गत वाद भाजपची खेळी; इम्तियाज जलील यांचा दावा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केवळ राजकीय फायद्यासाठीच भाजपने शिवसेनेअंतर्गत भांडण लावून दिले आहे. बीएमसीवर सत्ता मिळवणे हाच भाजपचा या मागील हेतू आहे. एकदा मुंबई महापालिका भाजपच्या हातात आल्यावर त्यांच्यासमोर दुसरे कोणतेही मोठे आव्हान नाही. त्यानंतर शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील, कळणारही नाही, असा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी केला.

गरज पडते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सेक्युलर भूमिका स्वीकारतात. परंतु, राजकारण करायचे असते, तेव्हा एमआयएम पक्षावर सर्रास भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला जातो. आता मुस्लिमांची मोठी व्होट बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर गेली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एमआयएमने यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला असल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद महापालिकेत पुढचा महापौर एमआयएमचाच होणार, असा दावा देखील त्यांनी केला. राजकीय स्वार्थापोटी शहराचे नामांतर करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे मुस्लिम जनता नाराज आहे. शहरातील मुस्लिम लोक औरंगजेबाला फॉलो करत नाहीत, परंतु तो इतिहासाचा एक भाग आहे. तो मिटवता येणार नाही. शहरात काही सुविधा नसताना फक्त श्रेय लाटण्यासाठी नाव बदलण्याचा घाट घातला जातोय, याला जनता उत्तर देणारच, असे वक्तव्य खा.जलील म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button