‘पुढारी’तर्फे सियाचीन हॉस्पिटल मध्ये होणार ‘हेरिटेज दालन’; २५ लाखांचा निधी प्रदान | पुढारी

‘पुढारी’तर्फे सियाचीन हॉस्पिटल मध्ये होणार ‘हेरिटेज दालन’; २५ लाखांचा निधी प्रदान

सियाचीन : हरीष पाटणे

हिमालयातील काराकोरम पर्वतरांगांमध्ये असलेल्या जगातील सर्वांत उत्तुंग रणभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सियाचीन भागात सैनिकांसाठी सियाचीन सैनिक हॉस्पिटल उभे करून राष्ट्रभक्‍तीचा मापदंड निर्माण करणार्‍या ‘पुढारी’ने सियाचीन हॉस्पिटलमध्ये आणखी एक माईलस्टोन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सियाचीन हॉस्पिटलमध्येच ‘हेरिटेज दालन’ (हिस्टॉरिकल रूम) उभारण्याचा निर्णय ‘पुढारी’ने घेतला असून त्यासाठीचा 25 लाखांचा निधी धनादेशाद्वारे सोमवारी सियाचीन हॉस्पिटलचे कर्नल सौरभ भारद्वाज यांच्याकडे ‘पुढारी’कडून प्रदान करण्यात आला.

सियाचीन ही जगातील सर्वांत उत्तुंग समरभूमी. कारगिल युद्धादरम्यान सियाचीन प्रदेशात कोणतेही हॉस्पिटल नसल्याने भारतीय सैनिकांचे प्रचंड हाल झाले. राष्ट्रभक्‍तीच्या भावनेतून लोकसहभागातून ‘पुढारी’चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या संकल्पनेतून सियाचीनलगतच्या हुंडेर येथे सैनिकांसाठी अत्याधुनिक असे सियाचीन सैनिक हॉस्पिटल उभारण्यात आले. 18 नोव्हेंबर 2001 या दिवशी तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस व डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते या हॉस्पिटलचा शुभारंभ झाला. गेल्या 20 वर्षांत या हॉस्पिटलने रुग्णसेवेसाठीच स्वत:ला वाहून घेतले आहे.

सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा या हॉस्पिटलमध्ये असून ईसीजी, इको कार्डिओग्राफी, ट्रेडमिल टेस्ट (टीएमटी), 24 तास अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, 24 तास ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, अल्ट्रा सोनोग्राफी, कलर डॉप्लर, फंडोस्कोपी, आयसीयू केअर, टेलिमेडिसिन, सुसज्ज लॅब, हेमॅटॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री, आर्टेलिअर ब्लड गॅस अ‍ॅनालिसिस अशा अनेक सुविधा सध्या या हॉस्पिटलमध्ये आहेत. ‘पुढारी’ने दिलेल्या निधीतून जवानांसाठी थंडीपासून संरक्षणासाठी स्वित्झर्लंडमधून आयात केलेली इलेक्ट्रिक ब्लँकेटस् आणि कलर डॉप्लर मशिन देण्यात आली आहेत.

सियाचीन सैनिक हॉस्पिटलच्या 20 वर्षपूर्तीच्या निमित्ताने दोनच दिवसांपूर्वी ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योेगेश जाधव व समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी भारतीय सैन्य दलाच्या उधमपूर येथील नॉर्दर्न कमांडमध्ये जाऊन लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांची भेट घेतली होती. त्यांच्या समवेत मेजर जनरल सुजित पाटील हेही उपस्थित होते. या भेटीदरम्यान वाय. के. जोशी व डॉ. योगेश जाधव यांच्यामध्ये सियाचीन हॉस्पिटलच्या एकंदर वाटचालीबाबतची चर्चा झाली होती.

जोशी यांनी दूरध्वनीवरून ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशीही चर्चा केली होती. या चर्चेदरम्यानच सियाचीन हॉस्पिटलमध्ये ‘पुढारी’च्या वतीने हिस्टॉरिकल रूम (हेरिटेज दालन) तयार करण्याचा मनोदय ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी बोलून दाखवला. या ऐतिहासिक दालनाची रचना कशी असावी याबाबतही त्यांनी अनौपचारिक चर्चा केली होती.

लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी त्यांचे स्वीय सहायक रणजित झेंडे, वृत्तसंपादक हरीष पाटणे, टोमॅटो एफएमचे प्रोग्रॅम हेड विद्यासागर अध्यापक यांना उधमपूर येथून लेहमार्गे सियाचीन हॉस्पिटलकडे रवाना केले.

‘पुढारी’च्या वतीने सियाचीन हॉस्पिटलच्या 20 व्या वर्षपूर्तीबद्दल तयार करण्यात आलेले स्मृतिचिन्ह कर्नल भारद्वाज यांच्याकडे प्रदान करण्यात आले; तर ‘पुढारी’ने पाठवलेला 25 लाखांचा धनादेश रणजित झेंडे, हरीष पाटणे, विद्यासागर अध्यापक यांनी कर्नल भारद्वाज यांच्याकडे सुपूर्द केला.

डॉ. योगेश जाधव यांची कर्नल सौरभ भारद्वाज यांच्याशी चर्चा

‘पुढारी’च्या वतीने हेरिटेज रूमसाठी 25 लाखांचा निधी स्वीकारल्यानंतर ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेेश जाधव यांच्याशी कर्नल सौरभ भारद्वाज यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉ. योगेश जाधव म्हणाले, भारतीय सैन्य अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सीमेवर सेवा बजावत आहेत. त्यामुळेच कर्तव्य भावनेने आम्ही सियाचीन हॉस्पिटलची उभारणी केली.

या हॉस्पिटलला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो. हॉस्पिटलमध्ये आपण सर्वजण सैनिकांची रुग्णसेवा करत आहात. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे हॉस्पिटल आता राष्ट्रीय प्रतीक ठरत आहे. त्यामुळेच या हॉस्पिटलमध्ये हेरिटेज दालन असावे, अशी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची इच्छा आहे. या कामात आपण सहकार्य करावे.

कर्नल सौरभ भारद्वाज म्हणाले, हॉस्पिटलची उभारणीच ‘पुढारी’ने केली आहे. 20 वर्षांत ‘पुढारी’ने सातत्याने हॉस्पिटलला सहकार्य केले आहे, मदत केली आहे. त्यामुळे भारतीय जवानांमध्ये व इथे उपचार घेणार्‍या रुग्णांमध्ये ‘पुढारी’विषयी कृतज्ञतेची भावना आहे. याबद्दल भारद्वाज यांनी डॉ. जाधव यांचे आभार मानले.

Back to top button