शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर आज निर्णय? | पुढारी

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर आज निर्णय?

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची अनिश्चितता अजूनही कायम आहे. या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार असल्याची चर्चा भाजप आणि शिंदे गटात आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दिल्लीत दाखल झाले आहेत.

या दौर्‍यात मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार हे निश्चित केले जाणार आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. 30 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिपदासाठी भाजप आणि शिंदे गटात जोरदार लॉबिंग सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळातील सर्व जागा न भरता शिंदे गटातील पाच आणि भाजपच्या कोट्यातील सात जागा भरण्याचे सूत्र ठरविण्यात आले होते. मात्र आता 30 मंत्र्यांचा समावेश होईल, असे कळते.

नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्यानंतर त्यांचा स्वागत समारंभ सोमवारी दिल्लीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने सर्व राज्यांतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निमंत्रितांसाठी स्नेहभोजन ठेवले आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. या दौर्‍यात मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात आले.

Back to top button