जवळ झोपण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या | पुढारी

जवळ झोपण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जवळ झोपण्यास नकार दिला म्हणून रागाच्या भरात एका सुरक्षारक्षकाने त्याच्या 48 वर्षांच्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उशिरा मालवणी परिसरात घडली. विजयमाला ज्ञानोबा बलाडे, असे या मृत महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येनंतर आरोपी पती ज्ञानोबा बलाडे याने मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, तो सध्या पोलीस कोठडी आहे.

मालाडच्या मालवणीतील गेट क्रमांक 8, अंदा कॉलनी, यशोदय सहकारी सोसायटीमध्ये घडली. या सोसायटीमध्ये बलाडे कुटुंबीय राहत असून ज्ञानोबा हा एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. काही दिवसांपासून त्याचा पत्नी विजयमालासोबत वाद सुरू होता. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. शुक्रवारी रात्री अकरा वाजता तो त्याच्या पत्नीच्या शेजारी झोपण्यासाठी गेला. मात्र तिने त्याला जवळ झोपण्यास नकार दिला होता. तो जवळ आल्यानंतर ती दुसर्‍या बाजूला जात होती. त्यातून त्यांच्यात पुन्हा खटके उडाले होते. रागाच्या भरात त्याने घरातील पाटाच तिच्या डोक्यात मारला. त्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर भयभीत झालेला ज्ञानोबा मालवणी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवून घेतली.

Back to top button