शिंदे गटाने कारवाईच्या याचिकेतून आदित्य ठाकरे यांना वगळले | पुढारी

शिंदे गटाने कारवाईच्या याचिकेतून आदित्य ठाकरे यांना वगळले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीप विरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १४ आमदारांविरोधात शिंदे गटाकडून अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र या याचिकेत आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे.

शिवसेनेच्या एकूण १५ आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले. मात्र शिंदे गटाकडून १४ जणांवरच कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे गटनेते आणि भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे शिंदे गट हा शिवसेनेचा मान्यता प्राप्त गट ठरला आहे. या गटाने लागू केलेला व्हीप शिवसेनेच्या उर्वरित १५ आमदारांनीही पाळणे आवश्यक होते. मात्र त्यांनी व्हीप मोडला असल्याने कारवाईची मागणी करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली.

आम्ही आदित्य ठाकरेंना नोटीस दिलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत. त्यांचा आम्हाला आदर आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली नाही, असे गोगावले म्हणाले.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या दुसऱ्या गटाची मोडल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारींची छाननी केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे पुढारीशी बोलताना सांगितले.

Back to top button