Eknath Shinde : शिवसेना वाचवण्यासाठी शहिद झालो तरी चालेल पण माघार नाही, मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला बंडाचा प्रवास… | पुढारी

Eknath Shinde : शिवसेना वाचवण्यासाठी शहिद झालो तरी चालेल पण माघार नाही, मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला बंडाचा प्रवास...

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री झालो, यावर विश्वास बसत नाही. या घटनेची ३३ देशांनी नोंद घेतल्याचे देवेंद्र फडणवीस सांगितले. स्वतःचे मंत्रिपद डावावर लावून ९ मंत्री, ४० आमदार, १० अपक्ष आमदार सत्तेतून बाहेर पडले. समोर मोठमोठे नेते होते, तर दुसरीकडे शिवसैनिकावर विश्वास होता, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, स्वत:चं मंत्रीपद डावावर लावून मी ५० आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या ५० लोकांचा. आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी येणार, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही.

मी मतदानाच्या दिवशी निघून आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांची शिकवण आठवली. बाळासाहेब म्हणायचे अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हणाला नाही. हा या आमदारांचा मोठेपणा आहे. सुनिल प्रभु यांना माहिती आहे माझं कशाप्रकारे खच्चीकरण झालं. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल. पण मागे हटणार नाही, अशी भावना शिंदेंनी व्यक्त केली.

ही छोटी मोठी घटना नाही. जे ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत सदस्यही इकडे तिकडे हलू देत नाही. पण हे एवढं मोठं का झालं, काय घडलं, कशासाठी झालं? २०-२५ वर्ष एकनाथ शिंदेने रक्ताचं पाणी केलंय. मी १७ वर्षांचा होतो. बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो. एका प्रकरणामध्ये मी आनंद दिघेंच्या संपर्कात आलो. वयाच्या १८ व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. अनेकजण सिनियर होते. त्यांना बोललो की यांना करा, तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, “मला शिकवतो का?”, अशी आठवण यावेळी शिंदे यांनी सांगितली.

एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरोशावर चाळीस आमदारांनी सगळं पणाला लावलं. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितलंय की पुढं काय व्हायचं ते होवो, तुमचं नुकसान होतंय असं वाटलं तर मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button