अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड! | पुढारी

अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड!

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात ९९ जणांची मतदान केले. दरम्यान, विधानसभेच्या बहुमत चाचणीत आज २० आमदार गैरहजर होते. दरम्यान बहुमत चाचणीनंतर सभागृहातील नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी भाषण करताना अनेकांनी टोलेबाजी केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी बाकावर राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष झाला आहे. यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. विरोधी पक्षनेता पदाच्या शर्यंतीत अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र अखेरीस अजित पवार यांच्याच नावाला पसंती देण्यात आली. विश्वासदर्शक ठराव मतदान झाल्यानंतर अध्यक्षांना अजित पवार हेच विरोधी पक्षेनेते असतील असे पत्र देण्यात आले होते. मात्र त्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणानंतर करण्यात आली.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी सातत्याने बारामतीचे आमदार म्हणून काम केले. त्यांनी बारामतीचे विकास मॉडेल विकसीत केले आहे. अजित पवार यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा अजित पवार यांच्यासमोर अनेक दिग्गज नेते होते. मात्र शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वमान्य नेतृत्व होण्याची किमया केली, अशी भावना व्यक्त केली.

अत्यंत समर्थपणे ते विरोधीपक्षाची बाजू मांडतील – जयंत पाटील

शासनाकडून ज्या त्रूटी राहातील त्यावर बोट ठेवण्याचं काम अजित पवार करतील. त्यांचा अनुभव त्यांच्या उपयोगी पडेल. त्यांना अनेक खात्यांचा अनुभव आहे. ते अर्थमंत्री होते, प्रत्येक खात्यातील बारकावे समजण्यात त्यांना सुलभ होईल. अत्यंत समर्थपणे ते विरोधीपक्षाची बाजू मांडतील. योग्य मुद्यांना सहकार्यही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Back to top button