अपहरण केलेल्या महिलेवर दोन महिने लैंगिक अत्याचार | पुढारी

अपहरण केलेल्या महिलेवर दोन महिने लैंगिक अत्याचार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  जानेवारी महिन्यांत उत्तरप्रदेशातून मुंबईत येताना जबलपूर येथून अपहरण केलेल्या एका 25 वर्षांच्या विवाहीत महिलेवर सलग दोन महिने लैंगिक अत्याचार करुन तिचे अश्‍लील व्हिडीओ बनवून ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका कुटुंबातील एका महिलेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हा दाखल होताच मोहम्मद औसेद मोहम्मद निसार ऊर्फ हुसैद याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. हुसैदला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत महिला ही मूळची उत्तरप्रदेशची रहिवाशी असून ती सध्या तिच्या कुटुंबियांसोबत धारावी परिसरात राहते. ती सोशल मिडीयात सक्रिय असून तिचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक अकाऊंट आहे. सोशल मिडीयावरुन तिची ओळख कलीम शेखशी झाली होती. तो तिचा काही महिन्यांपासून सोशल मिडीयावर पाठलाग करीत होता. मात्र तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तो तिला वेगवेगळ्या मोबाईलवरुन तसेच व्हॉट अ‍ॅप कॉलिंग करीत होता. एकदा चुकून तिने तिचा कॉल घेतला. यावेळी कलीमने तिच्याविषयी त्याच्याकडे बरीच माहिती आहे. तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घ्यावा नाही तर तो तिच्या पतीची हत्या करणार असल्याची धमकी दिली होती. तिची माहिती तिला शाहबाज नावाच्या व्यक्तीकडून मिळाल्याचे सांगितले होते.

24 जानेवारी 2022 रोजी ती उत्तरप्रदेशातून मुंबईत वाराणसी एक्सप्रेसमधून येत होती. यावेळी जबलपूर रेल्वे स्थानकात तिचे हुसैद आणि कलीमने अपहरण केले. आधी तिला बिहार व नंतर नेपाळला नेण्यात आले. सलग दोन महिने कलीमने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिचे अश्‍लील व्हिडीओ बनविले. ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केली होती. मार्च महिन्यांत तिने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली व मुंबईत पळून आली. घडलेला प्रकार तिने तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात कलीमसह त्याचे दोन भावोजी हुसैद, मुतीन, त्याची पत्नी, वडिल आणि बहिणीविरुद्ध तक्रार केली होती.

Back to top button