गटार तोडल्याने सायन स्थानक पाण्याखाली ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल  | पुढारी

गटार तोडल्याने सायन स्थानक पाण्याखाली ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात सायन रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी येऊ नये याकरिता मध्य रेल्वेने संरक्षक भिंतीमधून येणारी बेकायदेशीर गटारे बंद केली होती. परंतु काही अज्ञातांनी रेल्वेच्या संरक्षक भितीमधून जाणारी 12 ठिकाणची गटारे तोडून पुन्हा सुरु केली. त्यामुळे सायन रेल्वे स्थानकातील रुळ गुरुवारी पाण्याखाली गेल्याचे दिसून आले.

सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर बाहेरच्या परिसरातील पावसाचे पाणी येऊ नये म्हणून, रेल्वेने यंदा विशेष खबरदारी घेतली आहे. रेल्वेच्या संरक्षण भीतीमधून बेकायदेशीर येणार्‍या जल वाहिन्या आणि भुयारी गटार बंद केले आहे. न्यू सायन सोसायटीच्या आवारातून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तेथे पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागरिकांचा तक्रारीची दखल घेत काही दिवसांपूर्वी खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका, रेल्वे अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांसह घटनास्थळी भेट दिली. चर्चेदरम्यान या परिसरात पूर येऊ नये म्हणून पाणी उपसणार्‍या मिनी पंपिंग स्टेशनचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रेल्वेने ड्रेनेज होल उघडावे आणि ते बंद करू नयेत, असे निर्देश दिले आहेत. रेल्वे प्रशासनाने मात्र बेकायदेशीर भुयारी गटार बंदच ठेवले. त्यामुळे गुरुवारच्या पावसामुळे रात्रीच्या वेळी सायन स्थानकात रुळांवर पाणी आले.

सायन ते माटुंगा स्थानकादरम्यान 15 रेल्वेच्या संरक्षण भीतीमधून येणार्‍या बेकायदेशीर गटार बंद केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत काही अज्ञात व्यक्तीनी बंद गटारे तोडून पुन्हा सुरु केली. त्यामुळे अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

प्रवाशांना त्रास तरीही राहुळ शेवाळेंची लुडबूड

सायन ते माटुंगा स्थानकादरम्यान रेल्वेच्या संरक्षण भीतीमधून येणारी 15 बेकायदेशीर गटारे रेल्वेने बंद केली होती. त्यामुळे बाहेरचे पाणी रेल्वे ट्रॅकवर येऊ शकत नव्हते. मात्र काही अज्ञात व्यक्तीनी बंद केलेली ही गटारे तोडून पुन्हा सुरु केली आहेत. त्यामुळे पाणी आत येऊ लागले.

महापालिकेच्या एफ/उत्तर प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनीही काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेला पत्र पाठविले. 13 जून 2022 रोजीच्या या पत्रात त्यांनी मिनी पंपिंग स्टेशनचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रेल्वेने गटार उघडावीत. बंद करू नयेत, अशा सूचना खासदार राहूल शेवाळे यांनी दिल्या असल्याचे त्यांनी रेल्वेला कळविले. याच उघड्या गटारातून पाणी मोठ्या प्रमाणात आत येत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

Back to top button