बेस्ट कामगार आक्रमक | पुढारी

बेस्ट कामगार आक्रमक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  ड्युटी शेड्युलमध्ये बदल केल्यावरुन बेस्ट कामगार आक्रमक झाले आहेत. शेड्युलमध्ये बदल न झाल्यास बहिष्कारावर ठाम असल्याचे कामगारांनी सोमवारी प्रशासनाशी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले.

जाचक ड्युट्यांचे शेड्युल, चुकीचे काम वाटप, अधिकार्‍यांची मनमानी, तसेच ज्येष्ठ कामगारांचा विचार न करता रुट जॉईन करून ड्युटी वाढवणे यांसदर्भात गेल्या काही दिवसांपासून बेस्ट कामगांरामध्ये प्रचंड असंतोष आहे. कर्मचार्‍यांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी ज्येष्ठ बेस्ट कमिटी सदस्य सुनिल गणाचार्य तसेच अन्य बेस्ट कामगार पदाधिकारी व संघटनांनी सोमवारी वाहतूक विभागाचे उपमहाव्यस्थापक जाधव यांची भेट घेतली.

ड्युटी शेड्युलमध्ये आम्ही बदल करू असे आश्‍वासन यावेळी प्रशासनाच्या वतीने दिले गेले. पण या सर्व सूचना तोंडी न देता आगार व्यवस्थापकांना लिखित स्वरूपात देण्याविषयी किंवा या ड्युट्या शेड्युल स्थगित करून महिन्याभरात यात बदल करण्याची मागणी कामगारांनी केली. यावर एका ड्युटीसाठी संपूर्ण शेड्युल विस्कळीत होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

कामगारांचा विचार करून निर्णय घेतला नाही आणि लेखी सूचना दिल्या नाहीत तर या ड्युट्यांवरील बहिष्कार कायम राहील असे सुनिल गणाचार्य यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button