राजकीय घडामोडींवर कायदेतज्ज्ञांचे लक्ष | पुढारी

राजकीय घडामोडींवर कायदेतज्ज्ञांचे लक्ष

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर कायदेतज्ज्ञांचा लक्ष आहे, अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. थोरात म्हणाले, महाविकास आघाडी स्थापना करताना कार्यरत झालेले कायदेतज्ज्ञांचे पथक या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

या बैठकीत राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.राज्याच्या हितासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या राज्यातील प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांपासून जनतेची सेवा करत आहोत. पण शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे सध्या घटनात्मक पेचावर कायद्याची लढाई सुरु आहे. सध्या फक्त राजकीय संघर्ष सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावण्याचे कोणतेही कारण सध्या दिसत नाही. इतकेच नाहीतर राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असा इशाराही थोरात यांनी नाव न घेता भाजपाला दिला.

तसेच महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदार, मंत्र्यांबाबत काय करायचे याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या फुटीर आमदारांचा एक स्वतंत्र गट तयार केला आहे. याकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोणी कोणाच्या नावाने गट तयार केला तरी जोपर्यंत अधिकृतरित्या या गटाला आणि नावाला मान्यता मिळत नाही, तोवर याला काही अर्थ नाही. तसेच राजकीय परिस्थिती अडचणीची निर्माण झाली असली तरी राज्यात कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, असेही चव्हाण म्हणाले.

Back to top button