गृहसंकुलांनाही आमदार विकास निधी | पुढारी

गृहसंकुलांनाही आमदार विकास निधी

ठाणे: पुढारी वृत्तसेवा :  शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी आता लहान-मोठ्या गृहसंकुलांनाही मिळणार आहे. त्यांचा फायदा ठाण्यासह राज्यातील सुमारे एक लाख 22 गृहनिर्माण सोसाट्याना होणार आहे.
अर्थ विभागाने गृहसंकुलांना आमदारनिधी देण्यास हरकत नसल्याबाबतचा अध्यादेश 22 जून रोजी प्रसिद्ध केला असून, या निर्णयामुळे मुंबई, ठाण्यासह राज्यातील लहान-मोठ्या गृहसंकुलांना दिलासा मिळाला आहे. ठाणे शहरात सुमारे सहा हजार नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. जिल्ह्यात 34 हजार तर राज्यात एक लाख 22 हजार सोसायट्या आहेत.

लहान गृहासंकुलांना आर्थिक चणचणीमुळे अनेक समस्या भेडसावत असतात. येथील पायवाट, मलनिस्सारण, आसन व्यवस्था आदी सोयी-सुविधा सक्षमपणे निर्माण करता येत नाहीत. आमदार निधी मिळाल्याने ही विकास कामे होऊन रहिवाशांची समस्यांतून सुटका होणार आहे. मोठ्या गृहसंकुलांमध्येही अंतर्गत रस्ते आणि इतर सोयी-सुविधा देण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. या निर्णयाचा फायदा ठाणे शहरातील सहा हजार गृहसंकुलांमधील हजारो नागरिकांना होणार आहे

Back to top button