मध्य रेल्वेला मुंबईतील वारकर्‍यांचे वावडे ! | पुढारी

मध्य रेल्वेला मुंबईतील वारकर्‍यांचे वावडे !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  यंदाच्या आषाढी वारीकरिता भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 90 स्पेशल गाड्या अमरावती, सोलापूर आणि नागपूरहून चालविण्याचे नियोजन सुरु आहे. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळणार असला तरी या गाड्या मुंबईतून मात्र धावणार नसल्याने मुंबई आणि उपनगरातील भाविकांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.

आषाढीची वारी अवघ्या दोन आठवड्यावर येऊन ठेपली आहे. महत्वाचे सण, उत्सवाकरिता रेल्वेकडून स्पेशल गाड्या चालविल्या जातात. गणेशोत्सवात देखील रेल्वे जादा गाड्या सोडत्या. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, एलटीटी, पनवेल या टर्मिनसहून जादा गाड्या चालविल्या जातात. आषाढीकरिता देखील रेल्वेने जादा गाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे. दरवर्षी सुमारे 100 गाड्या सोडण्यात येतात. पण या गाड्या अमरावती, सोलापूर आणि नागपूरहून पंढरपुरकरिता चालविण्यात येतात.

मुंबईतून देखील मोठ्या प्रमाणात भाविक आषाढीला मुंबईतून जातात. परंतु दादर ते पंढरपूर ट्रेन ही आठवड्यातून फक्त तीन दिवस सोमवार,शुक्रवार आणि शनिवार धावते. या गाडीला नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे आषाढीकरिता मुंबईतून जादा गाड्या सोडण्याची मागणी प्रवासी करीत आहे.

Back to top button