इम्पेरिकल डेटाचे काम सुरूच राहणार : छगन भुजबळ | पुढारी

इम्पेरिकल डेटाचे काम सुरूच राहणार : छगन भुजबळ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी ) राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा डेटा गोळा करण्यासाठीचे सर्वेक्षण थांबवले जाणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. दरम्यान, हा डेटा मान्य झाला नाही तर मात्र ओबीसींची जनगणना करावी लागेल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी दिली.

इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आडनावावरून नोंदी करण्यात येत असल्याचा आरोप झाल्यानंतर यावरून जोरदार वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या बैठकीला उपमुुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार या नेत्यांनी बांठिया आयोगाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्‍त केली. आडनावावरून डेटा गोळा करण्यास या मंत्र्यांनी आक्षेप घेतला.

बैठकीविषयीची माहिती देताना छगन भुजबळ म्हणाले, आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी न्यायालयात सादर करावयाचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम समर्पित आयोगाकडून सुरू आहे. आडनावावरून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यास अडचणी येत आहेत. ही गफलत आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली. ही त्रुटी राहिली असली तरी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठीचे सर्वेक्षण थांबवण्यात येणार नाही. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

आरक्षण न मिळाल्यास जनगणना

मध्य प्रदेशच्या धर्तीवर इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश समर्पित आयोगाला देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र जर इम्पेरिकल डेटा मान्य न झाल्यास ओबीसींची जनगणना करावी लागणार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीतीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक
  • आडनावावरून डेटा गोळा करण्यास मंत्र्यांचा आक्षेप

हेही वाचा

Back to top button