१२ आमदारांसाठी रस्सीखेच; आघाडीकडून नाकेबंदी; खडसेंना पाडण्याचे भाजपचे डावपेच | पुढारी

१२ आमदारांसाठी रस्सीखेच; आघाडीकडून नाकेबंदी; खडसेंना पाडण्याचे भाजपचे डावपेच

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; येत्या 20 जून रोजी होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू असून आपले आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांनी नाकेबंदी केली असतानाच भारतीय जनता पक्षानेही नवे डावपेच आखल्याचे चित्र आहे. एकूण बलाबल पाहता 12 आमदारांच्या मतांसाठी चौरंगी खेचाखेची होईल, असे दिसते.

छोटे पक्षांचे 16 आणि अपक्ष आमदार 13 आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना यातील छोटे पक्ष आणि अपक्ष अशा 12 आमदारांची मते मिळाली होती. पण ही 12 मते पुन्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील याची आता खात्री नाही. भाजपचे 106 आमदार असताना भाजपला राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते मिळाली होती. आता भाजपला पाचव्या उमेदवारासाठी आणखी 12 मतांची गरज आहे. त्यामुळे आघाडी समर्थक आमदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचही उमेदवार निवडून आणताना आघाडीचा एखादा उमेदवार पाडण्याचाही प्रयत्न भाजपकडून होईल. खासकरून राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे भाजपच्या टार्गेटवर असल्याचे म्हटले जाते.

आपले आमदार सांभाळा

या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या वर्तुळात धाकधूक असून आपापले आमदार सांभाळा आणि उमेदवार निवडून आणा, अशी भूमिका आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून येतील, एवढेच म्हणजे काठावरचे 54 इतके संख्याबळ आहे. राष्ट्रवादीला आपले दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी तीन मतांची गरज आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची दोन मते येथे गृहीत धरलेली नाहीत. त्याबाबत निर्णय कोर्टात होईल. त्यामुळे आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या 12 मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. दोन्ही पक्षांत काही आमदार नाराज आहेत. त्यामुळे दगाफटका होऊ नये, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आपल्या उमेदवारांपुरती छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मतांची तजवीज करत आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीत खुले मतदान असताना, महाविकास आघाडी सरकारचे समर्थक छोटे पक्ष आणि अपक्ष अशा 11 आमदारांची मते भाजपने स्वतःकडे वळवल्याने शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला होता. आता गुप्‍त मतदानात पक्षाच्या नाराज आमदारांची मते भाजपकडे जाऊ नयेत म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेना सावध झाले आहेत. शिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांशी त्यांनी संपर्क साधला आहे.

काँग्रेसची मोठी कोंडी़

यात काँग्रेसची कोंडी झालेली दिसते. 44 आमदार असलेल्या काँग्रेसला दुसर्‍या उमेदवारासाठी आणखी दहा मतांची गरज आहे. ही रसद पुरवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे अतिरिक्‍त मते नाहीत. त्यामुळे या दहा मतांसाठी काँग्रेसची मदार आघाडीला समर्थन देणार्‍या छोटे पक्ष आणि अपक्ष या 12 मतांवर आहे. पण या 12 मतांवर आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही डोळा आहे. यातील काही मते या दोन पक्षांनी खेचली तर काँग्रेसचा दुसरा उमेदवार अडचणीत येईल. काँग्रेसमध्येही सगळे आलबेल आहे अशी स्थिती नाही. त्यांचे आमदारही नाराज आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने काँग्रेसच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून जबरदस्त फटका बसल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांनी काही दगाफटका होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली असून राज्यसभेच्या निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या 12 आमदारांच्या मतांसाठी आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्षांमध्ये खेचाखेची सुरू आहे.

आमदार पंचतारांकित नजरकैदेत!

सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना शनिवारपर्यंत मुंबई गाठण्याचे आदेश दिले आहेत. किमान पाच दिवस मुंबईत राहावे लागेल या तयारीने येण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेने पवईतील ‘वेस्ट इन’मध्ये आपले आमदार मुक्‍कामासाठी बोलवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांची ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. काँग्रेसच्या आमदारांसाठीही पंचतारांकित हॉटेलची व्यवस्था केली आहे. मात्र, हॉटेलचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. भाजपनेही आपले आमदार फुटू नये याची खबरदारी घेतली असून भाजपने कुलाबा येथील ‘ताज प्रेसिडेंट’ हॉटेलमध्ये आपल्या आमदारांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

Back to top button