काँग्रेसची राजभवनावर धडक | पुढारी

काँग्रेसची राजभवनावर धडक

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात तीन दिवसांत 30 तास चौकशी केली आहे. त्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकशीच्या पहिल्या दिवसापासून निषेध आंदोलनास सुरुवात केली आहे. गुरुवारी राहुल यांची चौकशी झाली नाही; पण ‘ईडी’ राहुल गांधींना अटक करू शकते, असे वाटू लागल्याने काँग्रेसने गुरुवारी देशभरात विविध राज्यांमध्ये राज्यपालांच्या निवासस्थानासमोर (राजभवन) काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव आंदोलन करत निषेध केला.

आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचा फवारा यांचा वापर केला. दरम्यान, शुक्रवारी ‘ईडी’ पुन्हा राहुल गांधींची चौकशी करणार आहे. त्यासाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यावर राहुल गांधी यांनी शुक्रवारी नको, सोमवारी चौकशी करावी, अशी विनंती केली आहे.

दिल्लीत राज्यसभा खासदार दीपेंद्र हुड्डा यांना पोलिसांनी त्यांच्या घरात नजरकैद केले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सचिन पायलट म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून सतत सर्व तपास यंत्रणांचा गैरवापर करत नेत्यांचा आवाज दाबला जात आहे. गांधीवादी पद्धतीने सत्याग्रह करून सरकारवर दबाव टाकू.

जयपूर येथे राजभवन परिसरात घेरावसाठी काँग्रेस कार्यकर्ते येणार होते; पण या भागात जमावबंदी लागू केल्याने काँग्रेसला सिव्हिल लाईन्स फाटक येथे आंदोलन करावे लागले. अनेक नेते बॅरिकेडवर चढले होते. शुक्रवारीही जिल्हा मुख्यालयात आंदोलन केले जाणार आहे. लखनौत राजभवन परिसरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली. येथे काही नेत्यांना नजरकैद केले होते. चंदीगड येथे राजभवनला घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवार्‍यांचा वापर केला. येथे अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिरुअनंतपुरम येथे आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवार्‍यांचा वापर केला. सिमला येथे पोलिस आणि आंदोलकांत बाचाबाची झाली. बंगळूर येथे डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या यांना ताब्यात घेतले गेले.

खा. रेणुका चौधरींनी पकडली पोलिस कर्मचार्‍याची कॉलर

हैदराबाद येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर जाळून राहुल गांधी यांच्या ‘ईडी’ चौकशीचा निषेध केला. राज्यसभेतील काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी यावेळी पोलिस कर्मचार्‍याची कॉलरही पकडली. खा. चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चौधरी म्हणाल्या, मी त्यांची माफी मागेन; पण आमच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल पोलिसांनीही माफी मागावी, महिला आंदोलन करत असताना पुरुष कर्मचारी का होते, असेही चौधरी म्हणाल्या.

Back to top button