मुंबईत 4.880 किलो चरस जप्त, वॉटर प्युरिफायर मधून व्हायची तस्‍करी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाची (एनसीबी) मुंबईत धडक कारवाई सुरु असून, मुंबईत कारवाई करुन 50 लाख रुपये किंमतीचे 4.880 किलो चरस जप्त केले आहे.  चरस जप्त प्रकरणी दोघा संशयित आराेपींना अटक करण्‍यात आली आहे.

‘एनसीबी’च्या मुंबई विभागाचे विभागीय संचालक अमित घावटे यांच्या पथकाला ड्रग्ज असलेले एक पार्सल ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ‘एनसीबी’ पथकाने १० जून रोजी एका कुरिअर कंपनीवर छापेमारी करुन 4.880 किलो चरस जप्त केले. हे ड्रग्ज वॉटर प्युरिफायरच्या आत बनवलेल्या विशेष पोकळीत लपवून ठेवत ते पार्सल ऑस्ट्रेलियाला नेण्यात येत असल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले.

ड्रग्ज जप्तीनंतर ‘एनसीबी’ने कन्साइनर आणि कुरिअर एजंट यांच्याकडे कसून चौकशी केली. यात कुरिअर फ्रँचायझी मालकाचाही अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. कुरिअर एजंट हे कन्साइनरच्या ओळखीची पडताळणी न करता पार्सल पाठवत असून, मुख्य प्राप्तकर्त्याच्या सूचनेनुसार अनेक वेळा पार्सल पाठवत असल्याचेही उघड झाले आहे.

दरम्यान, कुरिअरद्वारे पार्सल पाठवण्यासाठी कन्साइनरने बनावट ओळखीचा वापर केला आहे. तसेच या नेटवर्कने यापूर्वी अशा प्रकारे ड्रग्जची अनेक पार्सल पाठविण्यात आल्याचेही समोर आले असून, याप्रकरणी एनसीबी मुंबईने गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणचा तपास सुरू असल्याचे ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचलंत का? 

 

Exit mobile version