विधान परिषद रणधुमाळी सुरू | पुढारी

विधान परिषद रणधुमाळी सुरू

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीचे रणांगण तापले असताना 20 जूनला होणार्‍या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीची सुरुवात झाली आहे. शिवसेनेने माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांची नावे निश्चित केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. वयाच्या मुद्द्यावर शिवसेनेने आधीच माजी मंत्री रामदास कदम यांना विश्रांती दिली आहे. असे असले तरी सुभाष देसाई यांची अखेरच्या टप्प्यात वर्णी लागू शकते, अशीही चर्चा शिवसेनेत आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 9 जूनला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांत उमेदवार निश्चित करण्यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे.

शिवसेनेने संजय पवार यांच्या रूपाने एका जिल्हाप्रमुखाला राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तर आमशा पाडवी यांच्या रूपाने शिवसेना दुसरा जिल्हाप्रमुख विधान परिषदेच्या रिंगणात उतरविणार आहे. पाडवी यांनीच मंगळवारी आपल्याला उमेदवारीबाबत संजय राऊत यांचा फोन आल्याचे सांगितले.

2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडणारे सचिन अहिर यांचेही राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा आहे.

भाजपचे सहा सदस्य निवृत्त झाले असले तरी संख्याबळ पाहता या वेळी भाजपचे चार सदस्य विधान परिषदेवर जाणार आहेत. यापैकी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची निवड निश्चित आहे. मुंबई महापालिकेची प्रतिष्ठेची निवडणूक पाहता प्रसाद लाड यांना दुसर्‍यांदा संधी मिळेल, असे बोलले जात आहे.

तर अन्य दोन जागांसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि प्रा. राम शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांची नावेही चर्चेत आहेत. भाजप श्रेष्ठींकडून बुधवारी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडून रामराजेंना पुन्हा संधी, दुसर्‍या जागेसाठी एकनाथ खडसे

राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता दोन जागा निवडून जाणार आहेत. त्यापैकी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची उमेदवारी पक्की आहे. दुसर्‍या जागेवर विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी संधी देऊन उत्तर महाराष्ट्रात पक्षाला बळकटी देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र राज्यपालांनी त्यावर अजूनही स्वाक्षरी न केल्याने त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून विधान परिषदेत पाठविले जाणार आहे.

Back to top button