किरीट सोमय्या म्हणाले, रिसॉर्ट मालकीचा नाही तर कर कसा भरला? | पुढारी

किरीट सोमय्या म्हणाले, रिसॉर्ट मालकीचा नाही तर कर कसा भरला?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : जर दापोली येथील साई रिसॉर्ट इतरांच्या मालकीचे आहे तर तुम्ही कर कशासाठी भरत होतात, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना केला आहे. परब यांचे बेकायदेशीर रिसॉर्ट तुटणार व त्यांना शिक्षासुद्धा होणार असा दावाही सोमैया यांनी केला.

ईडीने मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर त्यांनी इतरांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे आपल्यावर ईडीने कारवाई केल्याचा दावा परब यांनी केला होता. तो सोमय्या यांनी खोडून काढला.

ते म्हणाले की, माझा रिसॉर्टशी संबंध नाही असे परब म्हणतात. मात्र माझ्याकडे 17 डिसेंबर 2020 ची पावती त्यांनी कर भरल्याची आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि अनिल परब परिवहनमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. परब यांनी 2020-21 चा मालमत्ता कर आपल्या खात्यातून भरला. रिसॉर्ट सदानंद कदम यांचा आहे तर तुम्ही का कर भरत होतात, असा सवाल सोमय्यांनी त्यांना विचारला आहे.

साई रिसॉर्ट हे 16 हजार 683 स्क्वेअर फूटाचे बांधकाम आहे. ही संपत्ती अनिल परब यांच्या नावे आहे. याचा बाजारभाव 25 कोटी रुपये आहे. आणि अनिल परब माझा रिसॉर्टशी संबंध नाही असे सांगत आहेत. उद्धव ठाकरेंनी 19 बंगल्यासंबंधी थोतांड केले. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही, अशा भाषेत  किरीट सोमय्या यांनी टीका केली.

दापोलीचा साई रिसॉर्ट अनिल परब यांचा आहे, असा अर्ज 2019 मध्ये परब यांनी शासनाकडे केला होता. त्याच्यावरील घरपट्टी, मालमत्ता कर 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षांचा अनिल परब यांनी भरला आहे. या रिसॉर्टचे वीज बील परब यांच्या नावावर आहे. हा रिसॉर्ट डिसेंबर 2020 मध्ये सदानंद कदम यांच्या नावावर अनिल परब यांनी ट्रान्सफर केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Back to top button